नवनाथ इधाटे
Jalna Loksabha Election : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. एरवी दानवेंची टोलेबाजी, किस्से आणि भाषणांना बहर येतोच, पण लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली असताना त्यात अधिकच भर पडते. भाजपने दानवे यांना सहाव्यांदा जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवातही केली. लोकांमध्ये रमणारे नेते म्हणून ओळख असलेले दानवे (Raosaheb Patil Danve) मतदारसंघातील शुभकार्यात आवर्जून हजेरी लावतात. आता तर निवडणुका आहेत, मग एकही लग्न सुटता कामा नये याकडे यासाठी ते धावपळ करताना दिसतात. अशाच एका फुलंब्री तालुक्यातील चौका येथील विवाह समारंभात त्यांचा सामना काँग्रेसचे माजी आमदार व जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार डॉ. कल्याण काळे (Dr Kalyan Kale) यांच्याशी झाला.
त्याचे झाले असे की हे दोघेही विवाह समारंभात सहभागी होऊन वधू-वरास शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सोबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गराडाही होता. काळे आले तेव्हा रावसाहेब दानवे (BJP Leader) स्टेजवर होते. वधू-वराला शुभेच्छा देत असताना तिथे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काळे यांनी खालीच थांबून वाट पाहणे पसंत केले. काही मिनिटांनंतर रावसाहेब दानवे स्टेजवरून खाली उतरले आणि जाऊ लागले. स्टेजवरूनच दानवे यांच्या चाणाक्ष नजरेने काळे यांची लगबग टिपली होती. त्यामुळे जाताना काळेंना चिमटा काढण्याची संधी त्यांनी हेरलीच.
'काळेसाहेब जा तुमच्यासाठी स्टेजवरची जागा रिकामी करून दिली', असा टोला त्यांनी लगावला. त्यावर काळे तरी गप्प कसे बसतील? मग त्यांनीही आपल्यातील हजरजबाबीपणाचे दर्शन घडवत 'दानवेसाहेब तुम्ही जागा खाली केल्याशिवाय आमचा नंबर कसा लागेल?' असा चिमटा काढला. त्यानंतर मात्र रावसाहेब दानवे स्मितहास्य करत तिथून निघून गेले.
जालना लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंची दमछाक केली होती. अवघ्या साडेआठ हजार मतांनी काळे तेव्हा मागे राहिले आणि दानवेंचा जीव भांड्यात पडला होता. आता 2024 मध्ये काँग्रेस (Congress) पुन्हा काळेंना मैदानात उतरवून दानवेंनाच चकवा देण्याच्या तयारीत आहे.
अद्याप काळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पक्षाकडून त्यांना संकेत मिळाल्यामुळे ते कामाला लागले आहेत. फुलंब्रीत हे दोन्ही नेते निवडणुकीआधीच समोरासमोर आले आणि त्यांच्यात जुगलबंदी रंगली. प्रत्यक्ष निवडणुकीत कोण कोणाला भारी ठरतो? हे मतदार ठरवतीलच, पण काळे-दानवे यांच्या जुगलबंदीने त्यांच्या समर्थकांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.
Edited By : Rashmi Mane
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.