Lok Sabha Election 2024 : हिंगोलीत आष्टीकरांची मदार सहानुभूतीवरच...

Nagesh Patil Ashtokar Hingoli News : सद्यपरिस्थितीत या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर महायुती वरचढ आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Hingoli News : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघांचा विचार केला, तर महायुती वरचढ असल्याचे चित्र आहे. सहापैकी केवळ कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले होते. (Latest Marathi News)

मात्र, शिवसेना पक्षफुटीनंतर तिथले आमदार संतोष बांगर हे शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत, तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघांत हिंगोली, किनवट आणि उमरेखेडमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर वसमत आणि हादगाव मतदारसंघात अनुक्रमे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार आहेत. या सहा मतदारसंघांवर नजर टाकली तर महायुतीचे प्राबल्य हिंगोली लोकसभा मतदारसंघात दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
BJP News: मोदींसह हे चाळीस नेते लोकसभा प्रचाराचा उडविणार महाराष्ट्रात धुरळा

विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि ठाकरे गटाला असलेली सहानुभूती यावरच आष्टीकर यांची मदार असणार आहे. महाविकास आघाडी असल्याने आष्टीकर यांना हादगाव मतदारसंघात फायदा होऊ शकतो, तर स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीतून किनवट मतदारसंघातही आष्टीकरांना छुपी मदत मिळू शकते, असे चित्र आहे.

दुसऱ्यांदा संधी नाकारण्याची परंपरा...

वसमतसारख्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजू नवघरे आमदार असले तरी तिथे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांचे चांगले वर्चस्व आहे. त्याचा फायदा आष्टीकर यांना होऊ शकतो. इतर मतदारसंघात मात्र आष्टीकरांना जोर द्यावा लागणार आहे. महायुतीने अद्याप हिंगोलीतील उमेदवार जाहीर केलेला नाही. तो जाहीर झाल्यानंतर आष्टीकरांसाठी हिंगोलीचा गड राखणे कितपत शक्य आहे, याचे चित्र स्पष्ट होईल. हिंगोली लोकसभा मतदारसंघातीलअलीकडच्या काळातील निकाल बघितला तर विद्यमान खासदाराला मतदारांनी दुसऱ्यांदा संधी नाकारली आहे.

शिवसेना व काँग्रेसला आलटून पालटून मतदारांनी संधी दिली आहे. हा ट्रेंड लक्षात घेता या वेळी हिंगोलीकर बदल घडवतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी निवडणूक लढविली होती, पण त्यांचा दारुण पराभव झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुभाष वानखेडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना पक्षाकडून काय शब्द दिला गेला होता, यावर वानखेडेंची लोकसभा निवडणुकीत भूमिका असेल.

Lok Sabha Election 2024
Congress News: काँग्रेसचा बालेकिल्ला मराठवाडा भाजप अन् शिवसेनेकडे कसा झुकला?

तिसरी आघाडी करणार बिघाडी...

वंचितच्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा करत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. त्याचा फटकाही काही प्रमाणात महाविकास आघाडीला बसू शकतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ठाकरे यांनी मराठा कार्ड खेळत महायुतीची कोंडी करण्याची खेळी केली आहे. त्याचा कितपत फायदा आष्टीकरांना होतो यावरही विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने अपक्ष उमेदवार दिला व त्याला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला तर या मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते.

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चांगली मते मिळाली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हादगाव, किनवट, उमरखेड या तीन मतदारसंघांत नागेश पाटील आष्टीकर यांचा जनसंपर्क आहे. तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे कामही चांगले आहे. हादगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आहे.

Lok Sabha Election 2024
Hingoli Loksabha 2024 : एकाच्या घरी नाश्ता तर दुसऱ्याच्या घरी जेवण; हिंगोली दौऱ्यात ठाकरेंनी साधला समतोल...

तसेच विद्यमान आमदार काँग्रेसचे असल्याने याचा फायदा आष्टीकरांना होईल. किनवट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांची साथ महत्त्वाची ठरणार आहे, तर कळमनुरी व हिंगोली (Hingoli) या मतदारसंघांत काँग्रेसला सोबत घेऊन आष्टीकरांना काम करावे लागणार आहे. हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com