Jalna News, 13 Jan : लोकसभेचा खासदार म्हणून आणि दोन टर्म आमदार असताना मतदारसंघात अनेक विकासाची कामं केली. पण तु्म्हीही कलाकार आहात, एवढी कामं करूनही मला का पाडलं सांगा? अन् ज्याला निवडून दिलं त्यानं तुमचं काय कल्याण केलं? ते ही सांगा, अशा शब्दात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात स्वतःचेच दुःख मांडले.
जालनाकरांनो तुम्ही निवडून दिलेला खासदार हा मुका, बहिरा आहे, अशी टीकाही त्यांनी कल्याण काळे यांच्यावर केली. जालना महापालिकेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात काँग्रेसचे विद्यमान खासदार कल्याण काळे यांना टार्गेट केलं आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पराभव केला.
दोन वर्ष आपण खासदार कल्याण काळेंवर टीका करणार नाही, त्यांना वेळ देईल आणि दोन वर्षानंतर जाब विचारील असे दानवे नेहमी सांगतात. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभांमधून दानवे यांनी काळेंवर टीका सुरू केली आहे. दोन वर्षात जालना मतदारसंघासाठी दोन लाख रूपयांचा निधी सुद्धा तुम्ही निवडून दिलेला खासदार आणू शकला नाही.
मग 'कल्याण'ला निवडून देऊन तुमंच काय कल्याण झालं? मी आज खासदार, मंत्री नसलो तरी आजही मतदारसंघासाठी तुम्ही सांगाल तितका निधी आणू शकतो. कारण राज्यात माझं सरकार आहे, केंद्रात आमच्या पक्षाचं सरकार आहे. मग जालन्यावाल्यांनो तुम्ही मला सांगा, मी एवढं काम करूनही तुम्ही मला का पाडलं? अन् कल्याण काळेनी असं काय केलं, की ज्यामुळे तुम्ही त्याला निवडून दिलं? असा सवाल रावसाहेब दानवे मतदारांना विचारत आहेत.
कल्याण काळे यांना जेव्हा विचारलं जातं, की रावसाहेब दानवेंनी तुम्हाला आव्हान दिले, तर ते म्हणतात मला पस्तीस वर्ष झाल्यानंतर विचारा. माझं त्यांना आणखी एक चॅलेंज आहे, आजपासून वर्षभराने मी सांगतो ती काम तुम्ही विद्यमान खासदार म्हणून करून दाखवा. नाहीतर तुम्ही मला कोणतीही दहा काम सांगा, मी खासदार नसताना करून दाखवतो. जर तुम्ही हे करू शकला नाहीत, तर याच चमनमध्ये येऊन तुम्हाला दहा उठबशा काढाव्या लागतील, असे आव्हान रावसाहेब दानवे यांनी कल्याण काळेंना दिलं.
उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना रावसाहेब दानवे यांची मस्ती गेली नाही, असा उल्लेख परवाच्या भाषणात केला. मी त्यांना सांगतो माझी मस्ती जाणारच नाही, कारण मी जरी हरलो असलो तरी माझा पक्ष राज्यात, केंद्रात जिंकला. मी पराभूत झालो म्हणून काय झाले? आजही माझ्या मतदारसंघासाठी आणि लोकांसाठी हवा तितका निधी आणू शकतो. तुम्ही तर मागच्या दाराने आले आणि दीड वर्षात घरी गेले, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.