Raosaheb Danve News  Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : `वंदे भारत` च्या निमित्ताने रावसाहेब दानवेंच्या सलग सहाव्या विजयाला हिरवा झेंडा ?

Jagdish Pansare

Marathwada BJP News : केंद्रातील मोदी सरकारने मंत्रीमंडळात खांदेपालट केला तेव्हा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचे मंत्रीपद गेले, अशा चर्चांना उधाण आले होते. स्वतः रावसाहेब दानवे यांनाही मोदींच्या धक्कातंत्राचा धसका घेतला होता. पण त्यांच्यासाठी मोदींचा धक्का हा सुखद ठरला होते. (Raosaheb Danve News) `उपभोगता मामले` खात्याच्या राज्यमंत्रीपदावरून दानवे यांना महत्वाच्या अशा रेल्वे, कोळसा आणि खाण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा पदभार सोपवण्यात आला.

दानवे यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा आश्चर्चयाचा धक्काच होता. पण या जबाबदारीमुळे पहिल्यांदा रेल्वे सारख्या खात्याचे राज्यमंत्रीपद (Marathwada) मराठवाड्याला मिळाले होते. त्यामुळे सहाचिकच दानवे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण बोलायला हजरजबाबी असलेल्या दानवे (Raosaheb Danve) यांनी `माझ्याकडे काही जादूची कांडी नाही`, असे सांगत सावध भूमिका घेतली होती.

पण मराठवाड्यात रेल्वेसाठी जे काही आणले जाईल ते जालन्यातूनच पुढे जाईल, अशी खूणगाठ जणू दानवे यांनी मनाशी बांधली होती. (Jalna) मुंबईकडे जाणारी जनशताब्दी दानवेंनी छत्रपती संभाजीनगर ऐवजी जालन्याहून सुरू केली. छत्रपती संभाजीनगरला मंजूर असलेली पीटलाईनही दानवेंनी पळवल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण या कांमाना रावसाहेब दानवे रेल्वे खात्याचे मंत्री झाल्यामुळेच गती मिळाली हे नाकरून चालणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रेल्वेमंत्री दानवे यांच्याकडून फारशा अपेक्षा नाही, पण त्यांनी निदान मराठवाड्यातील रेल्वेंना चांगले, स्वच्छ डबे तरी मिळवून द्यावे, असा टोला माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दानवे यांना लगावला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. देशभरात वंदे भारत ट्रेनचा गाजावाजा होत असतांना ही रेल्वे राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघ आणि भागातूनच जाणार नसेल तर ते दानवे यांच्या प्रतिष्ठेला शोभणारे निश्चितच ठरले नसते.

मराठवाड्यातूनही वंदे भारत ट्रेन आपल्याकडे कधी धावणार? असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात होता. अखेर रावसाहबे दानवे यांनी आपली शक्तीपणाला लावत रेल्वेमंत्री अश्विनकुमार यांच्याकडून जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन मंजूर करून आणलीच. आज अयोध्येतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅनलाईन पद्धतीने तर जालन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी `वंदे भारत` ला हिरवा झेंडा दाखवला.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी `वंदे भारत` जालन्याहून सुरू करत रावसाहेब दानवे यांनी `मास्टर स्ट्रोक` लागवला आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहबे दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी दिली जाणार आहे. `वंदे भारतच्या` निमित्ताने रावसाहेब दानवे यांच्या सहाव्या विजयालाच हिरवी झेंडी दाखवण्यात आल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT