Loksabha Election 2024 : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास हा तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. अस्सल ग्रामीण बोलीभाषा, कार्यकर्त्यांत मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव यामुळे रावसाहेब दानवे यांचा गेल्या 40 वर्षांचा राजकीय आलेख चढताच ठरला आहे. जनता पार्टीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात केल्यानंतर दानवे सध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे, कोळसा व खाण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत.
भल्याभल्यांना राजकारणात 'चकवा' देणारे म्हणून रावसाहेब दानवे यांची ओळख आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नावानिशी आजही ओळखणारे रावसाहेब दानवे यांच्या याच स्वभावामुळे कार्यकर्ते आजही त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत. अगदी भारतीय जनता पक्षासारखीच शिस्त त्यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना लावली आहे.
तळागाळातील अनेक गरीब व जुन्या कार्यकर्त्यांना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. भोकरदन पंचायत समिती, रामेश्वर सहकारी साखर कारखाना, मोरेश्वर शिक्षण संस्था, खरेदी-विक्री संघ, राजूर गणपती संस्थान अशा विविध संस्थांवर एकहाती वर्चस्व मिळवत रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात आपला प्रभाव कायम ठेवला. भारतीय जनता पक्षातही त्यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून ते प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास स्वकर्तृत्वावरच केला.
रावसाहेब दादाराव दानवे
18 मार्च 1956
पदवीधर, कला शाखा
जवखेडा खुर्द या भोकरदन तालुक्यातील छोट्याशा गावात रावसाहेब दानवे यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना रावसाहेब दानवेंनी स्वःकर्तृत्वावर राजकारणात स्थान निर्माण केले. दानवे यांचे चुलत बंधू भास्कर दानवे हे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांचे चिरंजीव संतोष दानवे हे 2014 पासून भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
कन्या आशा पांडे यांनी दगडवाडी गावात सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर त्या सोयगाव देवी या गटातून जिल्हा परिषद सदस्य झाल्या. दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे या 2009 मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून अवघ्या सोळाशे मतांनी पराभूत झाल्या होत्या. दानवे यांना तीन मुली आहेत. आशा पांडे या थोरल्या कन्या. उषा या जालन्याच्या आकात कुटुंबाच्या सून आहेत, तर संजना जाधव यांचा कन्नडच्या जाधव कुटुंबात विवाह झाला होता. ही दोन्ही राजकीय घराणी आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेती
जालना
भारतीय जनता पक्ष
दानवे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1978 मध्ये जवखेडा खुर्दचे सरपंच म्हणून केली, त्यानंतर ते भोकरदन पंचायत समितीचे सभापती झाले. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार संतोषराव दसपुते यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी लोकांशी नाळ तुटू दिली नाही. सामाजिक कार्य सुरूच ठेवले. 1990 मध्ये त्यांनी संतोषराव दसपुते यांना पराभूत करून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली. 1995 मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून पुन्हा दुसऱ्यांदा ते निवडून आले.
तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांनी त्यांना अचानक 1999 मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली आणि रावसाहेब दानवे खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सलग 2004, 2009, 2014, आणि मे 2019 एकूण पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी तत्कालीन प्रतिस्पर्धी उमेदवार कल्याण काळे यांना 'चकवा' देत विजय खेचून आणला. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
दरम्यान, ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजप सत्तेवर आला आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नव्या नेत्याचा शोध सुरू झाला. रावसाहेब दानवे यांनी पक्षनेतृत्वाला सूचित केले की ते मंत्री म्हणून राजीनामा देण्यास इच्छुक आहेत आणि जानेवारी 2015 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.
खासदार असतानाही हे पद भूषवणारे रावसाहेब दानवे हे महाराष्ट्र भाजपमधील दुसरे व्यक्ती आहेत. रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात भाजपने राज्यातील सर्वच निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. त्यामुळे सर्वात यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द नावाजली. मे 2019 मध्ये दानवे पुन्हा ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री बनले. पुन्हा दोन वर्षांनंतर रावसाहेब दानवे यांना पक्ष नेतृत्वाने सुखद धक्का दिला व त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तसेच कोळसा व खाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. आजतागायत ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.
पक्ष नेतृत्वाविरोधात त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात कधीही भूमिका घेतली नाही. पक्षविरोधी कारवायांपासून ते नेहमीच दूर राहिले. भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या अस्सल मराठवाड्याच्या ग्रामीण भाषण शैलीमुळे पक्षाचे कार्यकर्ते तर त्यांच्यावर फिदा होतेच, पण विरोधकांनाही त्यांच्या भाषणाने अनेकदा भुरळ घातली. आजही त्यांची भाषण्, त्याचे रेकॉर्डिंग लोक आवडीने ऐकतात, पाहतात. कार्यकर्त्यांना खिळवून ठेवण्याच्या त्यांच्या भाषणामुळे 'राजकारणातले इंदुरीकर' म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.
रावसाहेब दानवे सलग पाचवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. देश आणि परदेशातही मंत्री म्हणून त्यांनी दौरे केले. पण दिल्लीत त्यांचे मन कधीच रमले नाही, मतदारसंघावर त्यांचे कायम लक्ष असते. राज्यात कुठेही असले तरी रात्री कितीही उशीर झाला तरी दानवे मतदारसंघ जवळ करतात. चहाच्या टपरीवर बसून कार्यकर्त्यांसोबत गप्पा, रोज नियमित व्यायाम आणि फिरणे हा दानवेंचा आवडता छंद आणि दिनक्रमही अनेकांना भावतो. दिल्लीच्या गुलाबी थंडीत रमणारा खासदार हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून लवकर तुटतो, अशी त्यांची भावना ते बोलून दाखवतात.
जालना जिल्ह्यात आतापर्यंत संस्थांच्या मदतीने दानवे यांनी जवळपास एक लाख झाडे लावली आहेत. 2012 च्या दुष्काळात भोकरदन तालुक्यात दुष्काळी गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले तसेच नदी खोलीकरण व प्रमुख धरणांतील गाळ काढण्याच्या कामाला दानवेंनी निधी देखील उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दानवेंच्या शैक्षणिक संस्थेमध्ये मोफत संगणक प्रशिक्षण व शिवणकाम, फॅशन डिझायनिंग आदी कोर्सेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. कोविड दरम्यान गरजूंना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. दसरा, दिवाळी सणात दानवे यांनी वैयक्तिकरित्या 'आनंदाचा शिधा' वाटप केला.
2019 च्या निवडणुकीत भाजपकडून दानवेंना लोकसभेसाठी सलग पाचव्यांदा उमेदवारी मिळाली. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत जालना मतदारसंघात झाली. काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा तीन लाख 32 हजार 815 मतांनी दानवे यांनी दणदणीत पराभव केला.
2019 च्या ऐन निवडणुकीत दानवेंना उष्माघाताचा त्रास झाला. मतदारसंघात फिरण्यासाठी देखील त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. दानवे यांच्या कुटुंबियांनी त्यांचा बहुतांश प्रचार केला. छत्रपती संभाजीनगर येथे ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, तेथूनच त्यांनी प्रचाराची यंत्रणा हलवली. बूथ स्तरावरील काटेकोर नियोजन, मोदी यांचा करिष्मा व दानवे यांचा मतदारसंघातील तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याशी असलेला थेट संपर्क, यामुळे दानवे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. दानवे हे मूळ जालना मतदारसंघातील व काँग्रेसचे उमेदवार हे छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद )असल्यामुळे स्थानिक उमेदवार म्हणून दानवेंना फायदा झाला.
'घार उडते आकाशी, तिचे लक्ष पिलांपाशी' या म्हणीचा परिचय रावसाहेब दानवे यांच्या राजकीय जीवनाशी येतो. दुसऱ्यांदा केंद्रात मंत्री झाले असले तरी आठवड्यातून एकदा का होईना ते मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतात. कार्यकर्त्यांचे लग्नकार्य, उद्घाटन, सुखदुःखात सहभागी होत असतात. मतदारसंघातील विकासकामांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ते नियमित बैठका घेतात. मतदारसंघातील विविध सहकारी संस्था, कारखान्याच्या कारभाराचा नियमित आढावा ते घेतात. नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणे दानवेंना आवडते. मतदारसंघातील जुन्या-जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आजही दानवे नावानिशी ओळखतात.
रावसाहेब दानवे हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर केंद्र शासनाच्या विविध योजनांचा व त्यांच्या आखत्यारित असलेल्या मंत्रालयाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार, मतदारसंघातील भेटीगाठी कार्यक्रम यांचे अपडेट्स वेळोवेळी त्यांच्या अकाउंटवर दिले जाते. रावसाहेब दानवे यांच्याकडे सोशल मीडिया अकाउंट देखरेखीसाठी विशेष यंत्रणा आहे. ट्विटर, एक्सवरही ते सक्रिय आहेत. महापुरुषांची जयंती, दिनविशेष यासंदर्भात आठवणीने दानवे त्या त्या दिवशी समाज माध्यमांवर पोस्ट करतात.
आक्षेपार्ह अर्थाने चुकीचा अर्थ काढल्या जाणाऱ्या सार्वजनिक टिप्पण्यांमुळे दानवे वादात सापडले आहेत. 2016 मध्ये, मतदारसंघातील पैठण येथे निवडणुकीच्या प्रचारसभेत मतदारांना निवडणुकीच्या पूर्वसंध्येला लक्ष्मीला त्यांच्या घरी येण्यास सांगितल्याबद्दल (मतदान खरेदीचे संकेत देऊन) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे 2017 मध्ये जेव्हा तुरीचे भाव घसरले होते, तेव्हा दानवे यांनी एका कार्यक्रमात शेतकर्यांना 'साले' हा शब्द वापरला. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती आणि दानवे यांनी आपल्या टिप्पणीबद्दल खेद व्यक्त केला होता.
नंतर, 2019 मध्ये, त्यांनी सांगितले की, 'साले' हा शब्द एक सामान्य अपशब्द आहे, जो ग्रामीण मराठवाड्यात आजही रोजच्या भाषेत वापरला जातो. हा शब्द अपमानास्पद नाही, आणि शेतकर्यांना नाराज करण्याचा त्यांचा कधीही हेतू नव्हता. 2022 मध्ये त्यांनी एका भाषणादरम्यान नाभिक समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नाभिक संघटनांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली होती. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांनी 'मोकाट फिरणारा 'सांड' ही उपाधी दिल्यामुळे काँग्रेसने दानवे यांच्या विरोधात निदर्शने केली होती.
विठ्ठलअण्णा सपकाळ, प्रमोद महाजन आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी.
रावसाहेब दानवे यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य, राजकीय प्रगल्भता, मुरब्बी राजकारणी, प्रशासनावर अचूक पकड व कार्यकर्त्यांशी कायम नाळ जोडून ठेवणारा नेता म्हणून पाहिले जाते. दानवे यांनी भाजजच्या सर्वच संघटनांच्या पदांवर काम केले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या कार्यकाळात पक्षवाढीसाठी त्यांनी केलेले कार्य बहुजन समाजात भाजप रुजवणारे ठरले.
गोपीनाथ मुंडेनंतर पक्षाला मराठवाड्यात ओळख देणारे रावसाहेब दानवे हे एकमेव नेते, अशी त्यांची प्रतिमा आहे. आताचे भाजपचे राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सर्वच नेत्यांसोबत दानवेंचे सख्य आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दानवेंवर विशेष 'वरदहस्त' असून 'भला आदमी' म्हणून अमित शाह यांनी रावसाहेब दानवे यांचा उल्लेख केला होता. दानवे यांचे इतर पक्षांतील नेत्यांची चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची व रावसाहेब दानवेंची 'राजकीय मैत्री' जालना जिल्ह्याच्या राजकीय पटलावर विशेष अधोरेखित आहे.
दानवे यांनी जालना जिल्ह्यात भाजपमध्ये अन्य नेत्याला मोठे होऊ दिले नाही, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. माजी मंत्री बबनराव लोणीकर व रावसाहेब दानवे यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. अगदी जालना जिल्ह्यात भाजपच्या दोन कार्यकारिणीही आहेत. चुलत बंधू भास्कर दानवे, पुत्र आमदार संतोष दानवे कन्या जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे यांच्यावरून रावसाहेब दानवे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनच प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे नेते दानवे यांना घेरण्याचा प्रयत्न करतात.
उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षाविरोधात बंडखोरी करणार नाहीत. दुसरा उमेदवार दिला तरी पक्षश्रेष्ठी सांगतील त्या आदेशाचे दानवे तंतोतंत पालन करतील.
(Edited By - Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.