Raosaheb Patil  Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Patil Danve : निवडणुकीच्या धामधुमीतही दानवे रंगले भजन-कीर्तनात...

Jagdish Pansare

Chhatrapti Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी रखरखत्या उन्हात फिरताना राजकीय नेत्यांचा चांगलाच घाम निघत आहे. पक्षाच्या बैठका, पदयात्रा, बूथप्रमख, कार्यकर्त्यांचे मेळावे आणि हे सगळं करत असतानाच मतदारसंघातील लोकांच्या लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी नेत्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) जालना लोकसभा मतदारसंघातून (Jalna loksabha Constituency) सहाव्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. सलग पाच वेळा विजय मिळवल्यामुळे दानवेंचा आत्मविश्वास बळावलेला असला तरी ते कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीत. त्यांच्याविरोधात अजून महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार कोण? हे अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु उमेदवारी जाहीर झाल्यापासून रावसाहेब दानवे पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

या धामधुमीतही मतदारसंघातील नाथषष्ठीच्या यात्रेनिमित्त पैठणमध्ये (Paithan) दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन रावसाहेब दानवे भजन आणि कीर्तनात रंगल्याचे पाहायला मिळाले. संतसंगतीचे काय सांगू सुख याप्रमाणे पंढरपूरनंतरची सर्वात मोठी यात्रा ही नाथषष्ठीनिमित्त पैठणमध्ये दरवर्षी भरत असते. विशेष म्हणजे पैठण हा जालना लोकसभा मतदारसंघाचाच भाग असल्यामुळे दानवे दरवर्षी येथे वारकऱ्यांच्या भेटीला येत असतात.

यंदाचे वर्ष निवडणुकीचे (Loksabha Election 2024) असल्याने दानवेंनी खास या यात्रेकडे लक्ष देत तिथे पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावाही घेतला. नाथषष्टीसाठी केवळ मराठवाडाच नाही तर खान्देश, विदर्भासह महाराष्ट्रभरातून वारकरी बंधू-भगिनी पायी चालत एकनाथ षष्ठीच्या यात्रेला श्रीक्षेत्र पैठण येथे येतात.

त्यातील काही दिंड्यांतील वारकरी मंडळीची रावसाहेब दानवे यांनी नुकतीच भेट घेऊन त्यांच्या सोबत कीर्तन-भजनाचा आनंद घेतला. हाती टाळ आणि मृदंगावर थाप देत दानवे काहीकाळ भजनात रंगून गेले होते. भानुदास एकनाथ, रामकृष्ण हरिचा गजर करत दानवे वारकऱ्यांसोबत फुगडीही खेळले. आता सहाव्यांदा उमेदवारी मिळालेल्या दानवेंना एकनाथ महाराज विजयाचा आशीर्वाद देतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT