Ravindra Gaikwad, tanaji savant  Sarkarnama
मराठवाडा

Ravindra Gaikwad : घडलंय, बिघडलंय! कधीही उमरग्याला न आलेल्या सावंतांच्या भेटीला रवी सर गेले धाराशिवला

अय्यूब कादरी

Osmanabad News : असे म्हणतात, की राजकारणात काहीही घडू शकते. कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. याची प्रचिती वारंवार येत असते. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यात याची प्रचिती पुन्हा एकदा आली. धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते.

डॉ. तानाजी सावंत यांचा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत गायकवाड हे धाराशिव मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. त्यापूर्वी दोन वेळा ते उमरगा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. गायकवाड यांची मतदारसंघावर चांगली पकड होती. लोकांमध्ये ते अत्यंत सहजपणे मिसळायचे. कुणाशी वैरभावही ठेवत नसत. निवडणूक संपली की विरोधकांवरची टीका-टिप्पणी संपली, असा त्यांचा स्वभाव. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या जवळ गेलेल्या डॉ. तानाजी सावंत यांचा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. सावंत यांनी पक्षसंघटनेवर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत प्रा. गायकवाड यांना विश्वासात न घेता त्यांनी काही निर्णय घेतले. त्यापूर्वीही जिल्हा संपर्कप्रमुख नेमण्याची पद्धत शिवसेनेत होती. बहुतांश संपर्कप्रमुख मुंबईतील असायचे. स्थानिक नेते, आमदार, खासदारांना डावलून पक्ष संघटनेत तेच अधिक लुडबूड करायचे.

गायकवाड शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय

धाराशिवलाही तसेच होऊ लागले. खासदार असतानाही गायकवाड यांना विश्वासात न घेता नियुक्त्या केल्या जाऊ लागल्या. गायकवाड हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. मतदारसंघातील सर्वच जाती-धर्मांमध्ये गायकवाड यांच्या राजकारणाचा आधार होता. उमरग्यातील महाविद्यालयात ते प्राध्यापक होते, त्यामुळे तरुणांमध्ये ते लोकप्रिय होते. जातीय, धार्मिक दुफळी माजवणारे एकही वक्तव्य त्यांनी आतापर्यंतच्या राजकारणात केलेले नाही. त्यावेळी जिल्ह्यातील शिवसेनेच्या अन्य नेत्यांचेही राजकारण असेच होते. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची प्रतिमा कट्टर अशी कधीही नव्हती. एवढे सगळे व्यवस्थित असताना जिल्ह्याच्या राजकारणात डॉ. सावंत यांचा प्रवेश झाला किंवा ते करविला गेला. त्यावेळेपासून गायकवाड हे राजकारणात निष्क्रीय दिसू लागले. नेतृत्वाने काही गोष्टी स्वतःहून समजून घ्याव्यात, आम्ही बोलायची गरज भासू नये, असे त्यांना वाटायचे. नेतृत्वाच्या पुढे पुढे करायचीही सवय त्यांना नव्हती. त्यामुळे ते मागे पडले. धाराशिवसह शेजारचे लातूर, सोलापूर जिल्हे आणि उमरग्यालगतच्या कर्नाटकच्या गावांत शिवसेनेची वाढ करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

गायकवाड हे खासदार असताना निष्क्रीय राहिले, अशी माहिती जिल्ह्यातील त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पद्धतशीरपणे उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यात काही प्रमाणात तथ्यही होते. मात्र, पक्षाने त्यांची भूमिका समजून घेतली की नाही, हे गुलदस्त्यातच राहिले. दरम्यानच्या काळात विमानातील कर्मचाऱ्याला त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीचे प्रकरण गाजले. "मै शिवसेनिक हूं, भाजपवाला नही", असेही त्यावेळी ते बोलून गेले. ते नॉट रीचेबल झाले आहेत, असा मेसेज पसरवण्यात आला होता. त्यासाठी स्वतः गायकवाड हेही जबाबदार होते. असे असले तरी पक्षाने गायकवाड यांचे महत्त्व, त्यांची उपयुक्तता समजून घेतली नाही आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले.

पालकमंत्री सावंत एकदाही उमरग्याला आले नाहीत-

डॉ. सावंत आणि गायकवाड यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध नव्हते. आता ते दोघेही शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर मात्र दोघांचे संबंध ताणले गेले होते. सावंत हे जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख होते, आता पालकमंत्री आहेत. मात्र, त्यांनी एकदाही उमरग्याचा दौरा केलेला नाही की एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटनही केलेले नाही. आता शिंदे गटात असतानाही ते एकदाही उमरग्याला आले नाहीत. ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी झाला. हा कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ ग्रुपने भाडेतत्त्वावर घेतला आहे. या कार्यक्रमात सावंत आणि गायकवाड एकाच व्यासपीठावर होते. सावंत एकदाही उमरग्याला आले नाहीत. मात्र, गायकवाड यांना सावंतांच्या कार्यक्रमासाठी ढोकीला जावे लागले. गायकवाड यांच्यावर आता अन्याय होणार नाही, अशा आशयाची हमी सावंत यांनी दिली. एकेकाळी शिवेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शिलेदार राहिलेल्या गायकवाड यांना सावंत यांच्याकडून अन्याय होणार नसल्याची हमी मिळणे, दोघे एकाच व्यासपीठावर येणे या गोष्टी राजकारणाचे स्वरूप उलगडणाऱ्या आहेत. राजकारणात एखादी चूक किती महागात पडू शकते, याची जाणीव आता रवींद्र गायकवाड यांना नक्कीच झालेली असणार.

SCROLL FOR NEXT