Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चुरशीने झालेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काही तासांत समोर येणार आहे. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कारखान्याचा निकाल दुपारी चारपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. मात्र, सभासदांनी भोगावती कारखान्यातील सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. मतपेट्यांतून सभासदांनी अक्षरशः चिठ्ठ्यांचा पाऊस पाडत आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, धैर्यशील पाटील, हंबीरराव पाटील या रथी महारथींना चिठ्ठ्यांच्या माध्यमातून झोडपून काढले आहे. (Members target the rulers from the ballot box of Bhogwati)
आमदार पी. एन. पाटील यांनी सभासदांची बिले वेळेवर द्यावीत. सभासदांची साखर द्यावी. इथेनॉल आणि वीज प्रकल्प उभा करावा, असा संदेश देण्यात आला आहे. साखर झालेल्यांनी तरी साखर चोरू नये, असा टोलाही सभासदांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नात्यातील पंचायत समिती उमेदवारास निवडून आणण्यासाठी आपल्या गटाचे मतदान फिरवून काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिला. हाच उमेदवार पुढच्या पंचवार्षिकला घेऊ नये, म्हणून त्याला भोगवतीची उमेदवारी देतो, असे सांगून आपल्या मुलाची पंचायत समितीची उमेदवारी घेतली. भोगावती साखर कारखान्यातील दोन निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हातावर तुरी दिली, अशा शब्दांत सभासदांनी टीका केली आहे.
वैभवशाली कारखान्याला घराणेशाही, पै-पाहुण्यांचे राजकारण, इतरांचा हस्तक्षेप व बेफिकिरीमुळे कारखान्यात कर्जाच्या खाईत गेला. अता कारखान्याला कर्जातून बाहेर काढणाऱ्या एखाद्या खमक्या नेत्याची सभासदांना प्रतीक्षा आहे. सर्वोत्तम गाळप करणारा आणि अव्वल दर देणाऱ्या कारखान्याचे विस्तारीकरण झाले आणि घरघर लागली. कारखाना उभारणारी पिढी गेली आणि आत्मीयता संपली. अतिरिक्त नोकरभरती, चुकीची साखर विक्री, नियोजनाचा अभाव हे बिकट परिस्थितीचे कारण ठरले.
दहा वर्षांपूर्वी ए. वाय. पाटील, के. पी. पाटील यांनी थेट हस्तक्षेप करून ‘भोगावती’च्या निवडणुकीत सहभाग घेतला, सत्ता आणली. मात्र, त्या पाच वर्षांत ‘ए. वाय.’ यांचा हस्तक्षेप इतका वाढला की संचालक मंडळात दुफळी माजली. त्यानंतर पक्षापेक्षा गटा-गटांचे राजकारण निर्माण झाले. नरके गट, सतेज पाटील गट, महाडिक गट, आबिटकर गट या माध्यमातून बाह्यनेत्याशी सल्लामसलती होऊ लागल्या. यामुळे येथील नेत्यांमधील खमकेपणाचा अभाव पुढे आला. त्यामुळे वैभवशाली कारखान्याला घराणेशाही, पै-पाहुण्यांचे राजकारण, इतरांचा हस्तक्षेप व बेफिकिरीची नजर लागली, असे सभासदांचे मत आहे. त्यामुळे आजचा निकाल कोणाच्या पारड्यात जाणार, हेच महत्त्वाचे आहे.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेसाठी रविवार (ता. १९ नोव्हेंबर) ८६.३३ टक्के इतके मतदान झाले. तीन आघाडी प्रमुखांची प्रतिष्ठा आणि आजी-माजी संचालकांसह ८१ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत या वेळी नऊ टक्के अधिक मतदान झाल्याने हा ‘टक्का कुणाला धक्का देणार’ हे थोड्याच वेळात कळणार आहे.
मतमोजणी कोल्हापूर येथे शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये आज होत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या कारखान्यासाठी प्रारंभापासूनच बिनविरोधबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, अंतिम टप्प्यात तीन आघाड्या रिंगणात उतरल्या होत्या. यंदा मतदानाचा टक्का वाढला असल्याने सत्ताधाऱ्यांना काही ठिकाणी धक्का मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.