Pathri Municipal Council : परभणी जिल्ह्यात राज्याच्या सत्तेतील महायुतीचे दोन मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुन्हा खटके उडू लागले आहेत. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेच्या सईद खान यांना रोखणे आमदार राजेश विटेकर आणि इतर जिल्ह्यातील विरोधकांना जमले नाही.
जिल्हा बँकेतही सईद खान यांनी भावासह स्वतः एन्ट्री घेत आपण विरोधकांवर भारी ठरल्याचे दाखवून दिले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी शांतपणे सावध खेळी करत अखेर आमदार सईद खान यांना झटका दिला आहे. पाथरी नगर परिषदेमधील दोन नगरसेवकांनी नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत थेट राजेश विटेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
नगरसेवक हसीब खान व आलम तरन्नुम बेगम मुजीब या दोन नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. या फुटीमुळे आमदार सईद खान चांगलेच संतापले आहेत. जिल्हा बँक, विधान परिषद आणि नगरपरिषदेतील सत्तेत नात्यागोत्याचे राजकारण करून आणि माझ्या विरोधात काँग्रेससोबत हातमिळवणी करूनही सत्ता मिळवता आली नाही.
राजेश विटेकर यांना आपली वसमतची नगरपरिषदही सांभाळता आली नाही. काँग्रेसच्या आंदोलनाला जाणे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी जाऊन माझ्या विरोधात काम करणे, राज्यात महायुती असताना स्थानिक पातळीवर युतीधर्म न पाळणे, अशा गोष्टी राजेश विटेकर यांनी केल्या आहेत, असा आरोप दोन नगरसेवक पक्ष सोडून गेल्यानंतर सईद खान यांनी केला आहे.
दोन नगरसेवक गेल्याने मला काही फरक पडत नाही. आमचे दोन नेले, तर त्यांचे चार खेचून आणण्याची ताकद सईद खानमध्ये आहे. मीही एकनाथ शिंदेंचा आहे, अशा शब्दांत सईद खान यांनी राजेश विटेकर यांचे थेट नाव घेत त्यांना इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.