- प्रसाद जोशी
MLC Election : विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेने सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. खान यांच्या उमेदवारीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'खाण की बाण' बाजूला ठेवत अल्पसंख्याक कार्ड खेळल्याचे दिसून येते. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डाॅ. विवेक नावंदर मैदानात उतरले आहेत. दोन्ही उमेदवारांनी सोमवारी (1 जून) अर्ज दाखल केले. पण तेव्हापासूनच सईद खान धोक्यात असल्याचे सांगितले जाते.
सईद खान यांना उमेदवारी देत शिवसेनेने महाविकास आघाडीला चेक देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महायुतीमध्ये सईद खान यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा अर्ज दाखल करतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी अनुपस्थित होते. याच नाराजीचा फटका महायुतीला बसू शकतो. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार विवेक नावंदर यांच्या मात्र यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराजीचा एकमेव आधार सध्या त्यांना वाटत आहे.
राष्ट्रवादीच मोठा भाऊ
संख्याबळाचा विचार करता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ आहे. एकूण 465 मतदार असून त्यापैकी राष्ट्रवादीकडे 131 सदस्य आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून त्यांच्याकडे 99 मतदार आहेत. 77 मतदार असलेला शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेचे फार संख्याबळ नसतानाही पारंपारिक जागा, मराठवाड्यातील एकतरी मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ही जागा मागून घेतली होती.
तर महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असून पक्षाकडे 59 मतदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 43 व इतर मित्रपक्षांची संख्या गृहीत धरूनही आकडा 150 च्या पुढे जाईल, अशी शक्यता नाही. अशावेळी काही चमत्कार घडला तर महाविकास आघाडी चमत्कार दाखवू शकते. पण महायुतीतील मुख्य पक्षांची एकजूट झाल्यास विजयी होण्यासाठी सईद खान यांना कोणतीही अडचण येणार नाही.
राष्ट्रवादीत नाराजी :
महायुतीच्या जागावाटपमध्ये परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. शिवसेनेकडून माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी जोरदार फिल्डिंग लावली. मात्र स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार या वादामुळे बाजोरिया यांचा नाव मागे पडले आणि सईद खान यांनी बाजी मारली. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार राजेश विटेकर वा अन्य कोणीही पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते.
यातून राष्ट्रवादीने योग्य तो संदेश दिल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी मतदानापर्यंत टिकली तर नक्कीच निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो. कारण, महायुतीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांच्याबद्दल जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांमध्ये सहानुभूती दिसून येत आहे. तसेच आमदार विटेकर व सईद खान यांच्यामध्ये विधानसभा निवडणूकी वेळी मोठ्या प्रमाणावर वाद उफाळून आला होता.
विटेकर-खान वाद नेमक काय?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश विटेकर यांनी दिलेला शब्द मोडला असा जाहीर आरोप सईद खान यांनी केला होता. पाथरी विधानसभा मतदारसंघात रासपकडून उमेदवारी मिळवत त्यांनी निवडणूकही लढवली होती. पाथरी नगर परिषद निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आमनेसामने लढले होते.
त्यानंतर दोन्ही पक्षात दिलजमाई झाली आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. पण सध्या पुरेसे संख्याबळ नसलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांचे आमदारकीचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराजीवर अवलंबून आहे. अन्यथा महायुतीमधील तीनही पक्षांचा समन्वय झाला तर संख्याबळाच्या आधारे महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.