Sambhaji Nagar Election: शिवसेनेत फूट पडल्यानंतर दहा वर्षांनी होत असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिल्यादांच स्वबळावर तब्बल 93 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पंचवीस वर्ष खान हवा की बाण? या भोवती निवडणुका लढवल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने एक नव्हे तर तब्बल आठ मुस्लिम उमेदवारांच्या हाती मशाल दिली आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी विरोध करत उमेदवारी मिळू देणार नाही, असा इशारा दिलेल्या अब्दुल रशीद खान मामू यांनाही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिका निवडणुकीत 115 पैकी 93 जागांवर उमेदवार दिले आहेत. किरकोळ जुने चेहरे वगळता नव्या चेऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नेते चंद्रकांत खैरे यांनी विरोध केलेले माजी महापौर रशीद मामू यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. काही प्रभागात ऐनवेळी उमेदवार बदलल्याने व जुन्यांना डावलल्याने नाराजीचा सूर आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक गळती लागली.
पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगरसेवकांनी जय महाराष्ट्र केल्यामुळे पक्ष कमकुवत झाला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी देखील मारामार सुरू होती. असे असले तरी पक्षाने 93 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यात माजी महापौर रशीद मामू यांचा देखील समावेश आहे. रशीद मामू यांचा प्रवेश नेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने झाला होता, पण खैरे यांनी विरोध केला होता. ‘मामूं’ना तिकिट मिळू देणार नाही, असा इशारा खैरे यांनी दिला होता, मात्र त्याच्या विरोधाला न जुमानता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. यात ऐनेवेळी अनेकांना अर्ज भरण्यास सांगण्यात आल्याने नाराजीचे चित्र आहे.
रशीद मामू यांच्या प्रवेशावरून भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतरही पक्षाने आठ मुस्लिम उमेदवारांना ‘बी’ फॉर्म दिला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केलेल्या माजी नगरसेवक सोहेल शेख यांना डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत.
चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप प्रवेश थांबल्यानंतर ऋषीकेश पक्षात सक्रीय नव्हते. दरम्यान क्रांती चौक भागातून निडणुकीसाठी त्यांनी चाचपणी देखील केली. पण ठाकरे सेनेच्या यादीत त्यांचे नाव नाही. यादीवर अंबादास दानवे यांची छाप असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.