Sambhaji Nagar ZP : राज्यात महापालिकेत भाजप-शिवसेना एकत्र असताना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर मात्र भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि शिंदेसेनेला बाजूला सत्तेपासून दूर ठेवलं. यावरुन आता शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला चर्चेमध्ये गुंतवून ठेवत भाजपनं विश्वासघात केला आहे, केसानं आमचा गळा कापला. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
सत्तार म्हणाले, "आम्हाला बाजुला ठेवण्याचा खरंतर प्रश्नच येत नाही कारण संभाजीनगर झेडपीत सत्ता स्थापन करण्याबाबत आमची मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी आमचं बोलणं झालं होतं. त्यानंतर उदय सामंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं झेडपीत सत्ता स्थापनेबाबत बोलणं झालं. आम्हाला सांगितलं की तुम्हाला अध्यक्षपद देतो त्यामुळं आम्ही निवांत राहिलो. यानंतर भाजपनं आम्हाला बाजुला ठेवत सत्ता स्थापन केली हा प्रकार म्हणजे केसानं गळा कापण्याचा प्रकार आहे. आमचा विश्वासघात झालेला आहे.
यंदा राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामध्ये सगळीकडं सध्या महायुतीची सत्ता आहे, ही सत्ता आम्हीच आणली. जर एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. इतका मोठा त्यांचा त्याग असूनही त्यांनी मित्र पक्षांमध्ये मोठ्या भावानं छोट्या भावाला खाण्याचा हा पहिल्यांदा घडलेला प्रकार संभाजीनगर जिल्ह्यातला हा दुर्देवी आहे. याची आम्ही आमच्या वरिष्ठांना माहिती देऊ, या निर्णयाचे परिणाम म्हणजे जिल्हा परिषदेपुरते नाहीत तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्यासोबत आहोत. आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत शब्द दिला म्हणजे दिला. भाजपनं युतीचा धर्म भाजपनं पाळलेला नाही त्यामुळं आम्ही संभाजीनगर झेडपीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. यानंतरही अनेक निवडणुका होतील हा काय फक्त संभाजीनगर जिल्ह्याचा एकमेवर प्रश्न नाही. ही शिवसेना इतकी सोपी नाही, एकनाथ शिंदे हा आमचा नेता इतका मोठा प्रयोग करु शकतो. आम्हाला अंधारात ठेवून यांनी गळा कापलेला आहे.
सत्तारांनी पुढे सांगितलं की, "शेवटपर्यंत हे बोलले की, आम्ही संभाजीनगरमध्ये चर्चेसाठी येत आहोत, आपण दोन दिवस निवडणूक पुढे ढकलू, निवडणूक होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही शिवसेनेला धोका देणार नाही अशा शब्दात रविंद्र चव्हाण आणि उदय सामंत यांच्यात चर्चा झाली. मी या राजकारणात नव्हतो कारण माझ्या घरात दुःख झाल्यानं मी यापासून दूर होतो. पण इतर आमचे स्थानिक नेते या चर्चेत सहभागी होते. तसंच आमचे वरिष्ठ नेतेही या चर्चेत होते. आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं की आपली झेडपीसाठी युती झाली आहे, तुम्ही काहीही करु नका. त्यानंतर युती झाल्यानंतर हे परिणाम आपण पाहात आहोत.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे झालं त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणात शंभर टक्के होणार असा गंभीर इशारा यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिला. याची तक्रार आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांकडं करु, आम्ही पाचही आमदार मुंबईत जाऊन एकनाथ शिंदेची भेट घेणार आहोत. हा पक्षाचा विषय आहे ही काही छोटीशी निवडणूक नाही, याचे परिणाम पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भोगावे लागतील, असंही अब्दुल्ल सत्तार यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.