Latur district cooperative bank; Sambhaji Patil Nilangekar And Babasaheb Patil sarkarnama
मराठवाडा

Latur DCC Bank News : मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पलटीने संभाजी पाटील निलंगेकर भडकले, थेट राजीनाम्याची मागणी करणार

Latur DCC Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा इशारा दिला. मतदार याद्यांतील कथित अनियमिततेवरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

Jagdish Pansare

Latur DCC Bank News: गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे लातूर जिल्हा बँकेच्या कारभारावरुन काँग्रेससह राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहे. पाटील यांनी अधिकारांचा गैरवापर करत दोन मतदार याद्यांमध्ये नावे घुसवल्याचा गंभीर आरोप भाजपचे निलंगेकर यांनी जाहीरपणे केला आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय आदल्यादिवशी जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. सहकार पॅनल हे नाव देखील बाबासाहेब पाटील यांनी सुचवले. मात्र दुसऱ्या दिवशी ते काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांच्या गाडीतून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले. महायुतीत आपल्याकडून कुठलीही चूक होऊ देऊ नका असे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे मी निवडणुक संदर्भातील बैठकीत बाबासाहेब पाटील यांची दिलगिरी व्यक्त केली होती.

मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका घेत महायुतीच्या विश्वासाला तडा दिला आहे. यापूर्वीही आम्ही त्यांच्या बाबतीत त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आमचे प्रमुख नेते यांना लेखी तक्रारी केल्या आहेत. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक युती म्हणून एकत्र लढा असा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाल्यानंतर स्थानिक पातळीवर बाबासाहेब पाटील यांनी थेट काँग्रेसची हात मिळवणी केली आहे.

त्यांना महायुतीचे मंत्री म्हणून त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. सहकार खात्याचे मंत्री असल्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करत बाबासाहेब पाटील ही निवडणूक लढवत आहेत.

निवडणूक विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे एक आणि न्यायालयात दुसरी अशा दोन मतदार याद्या तयार केल्याचा गंभीर आरोपही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. संपूर्ण प्रकाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही निलंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.

बाबासाहेब पाटील म्हणतात आम्ही 40 वर्षांपासून सोबत

एकूणच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशमुख कुटुंबांच्या ताब्यातून खेचण्याचे भाजपच्या नेत्यांचे मनसुबे त्यांच्याच युतीतील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या भूमिकेने उधळले गेले आहेत. बाबासाहेब पाटील यांनी मात्र, आपण 40 वर्षांपासून जिल्हा बँकेत काँग्रेस सोबत आहोत. बँकेचा कारभार स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे येथे पक्षीय राजकारण आणायचे नाही हे मी ठरवले होते. त्यानुसारच आपली भूमिका या निवडणुकीत देखील असणार आहे, असे स्पष्ट करत आपण काँग्रेस सोबतच असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवण्यासाठी भाजपचे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या घरी बैठक झाली, त्यात युतीने एकत्रित लढण्याचा निर्णय झाल्याचे बाबासाहेब पाटील यांनी अमान्य केले. तिथे महायुतीचे नेते एकत्र जमले होते, मीही सहभागी झालो, परंतु या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, असा दावा बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.

रमेश आप्पा कराड यांचे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी सगळे नेते तिथे जमलेले होते त्यामुळे मीही तिथे होतो, असे सांगत संभाजी पाटील निलंगेकर यांचा दावा बाबासाहेब पाटील यांनी फेटाळला. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपने स्वतंत्र पॅनल उतरवण्याची तयारी करत काँग्रेस आणि बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात आक्रमकपणे लढण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT