

सचिन चोबे
Marathvada graduate constituency News: सध्या राज्यातील शिक्षक व पदवीधरसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्याच्या चर्चा दिसत आहेत. अमरावतीसह पुण्यातील शिक्षक व पदवीधर मतदार संघात महायुतीमधील बंडखोरी वरून शिवसेनेमध्ये नाराजी पसरली होती. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी युतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना शिवसेनेचा पाठिंबा नसेल असे जाहीर केले होते.
महायुतीचे उमेदवार सतिश चव्हाण यांनी संजय शिरसाट यांच्या घरी भेट दिली त्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलत चव्हाण यांनाच आपला पाठिंबा असेल हे जाहीर केले. शिवसेनेने महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांच्या पाठीशी तन-मन-धनाने उभे राहण्याचा निर्णय घेतला असताना सिल्लोड सोयगाव विधानसभेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.
आपल्या मतदारसंघातील पदवीधरांच्या पहिल्या पसंतीचे मत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच देणार, अशी भूमिका घेत सिल्लोड येथील आपल्या संपर्क कार्यालयात थेट आढावा बैठकच घेतली. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत.
धक्का तंत्राच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी निवडणूक कुठलीही असो आपली चर्चा कशी होईल याची खबरदारी कायम घेतल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर- जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्तार यांनी आपले सुपुत्र समीर यांनाच महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करायला लावला होता.
अर्थात यामागे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आपल्या मनाप्रमाणे घडावे ही खेळी होती. त्यांच्या या दबाव तंत्राचा त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फायदाही झाला. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जालना मतदारसंघात देश पातळीवर एनडीए आणि राज्यात महायुती असताना अब्दुल सत्तार यांनी उघडपणे काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांना मदत करत रावसाहेब दानवे यांच्या पराभवाला हातभार लावला होता.
आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगत आली असताना, महायुतीचा बेरंग करण्याचा प्रयत्न सत्तार यांनी केल्याचे दिसत आहे. संजय शिरसाट यांनी शिवसेनेची भूमिका जाहीर करत सतीश चव्हाण यांना आपल्या घरी बोलावून घेत तन-मन-धनाने पाठिंबा जाहीर केला.
अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे दोघे एकाच पक्षात असले तरी एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. जिल्हा बँकेत या दोघांमध्ये ऑल इज वेल झाल्याचे चित्र होते. पण ते क्षणभंगुर ठरले आहे. शिरसाट यांनी परस्पर जाहीर केलेली भूमिका, आणि युतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या सतीश चव्हाण यांच्याकडून अब्दुल सत्तार यांची न घेतलेली दखल याचा परिपाक म्हणून सत्तार यांच्या या वेगळ्या भूमिकेकडे पाहिले जात आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये महायुतीकडून तीन टर्म आमदार असलेले सतीश चव्हाण चौथ्यांदा मैदानात आहेत. तर त्यांची लढत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवखे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांच्याशी होत आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्वतंत्र उमेदवार असला तरी काँग्रेसनेही शरद पवार यांच्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मत देण्याचा निर्णय काल जाहीर केला.
खासदार कल्याण काळे आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय मैत्री पाहता सत्तार यांनी शरद पवारांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा जाहीर करणे यामागे काळे यांच्याशी असलेली मैत्री हे देखील एक कारण असल्याचे बोलले जाते. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असे जाहीर केलेले असताना अब्दुल सत्तार यांनी मात्र नेहमीप्रमाणे वेगळी भूमिका घेत आपल्याच पक्षाला धक्का दिला आहे. आता यावर एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.