Samruddhi Highway
Samruddhi Highway Sarkarnama
मराठवाडा

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर तरूणाचं टशन : फायरिंगचा व्हिडीओ व्हायरल,गुन्हा दाखल!

सरकारनामा ब्यूरो

फुलंब्री : सावंगी परिसरातील समृद्धी महामार्गाच्या बोगद्यासमोर एका तरुणाने फिल्मी स्टाइलने बंदुकीतून फायरिंग केली. याचा व्हिडिओ त्या तरूणाने इंस्टाग्रामवर व्हायरल केला. या तरुणाविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा तरुण फरार असून, पोलिसा तरूणाचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी महामार्ग खुले झाले आहे. मात्र, सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर एका तरुणाने स्कार्पिओ क्रमांक एम. एच. २० एफ.जी. २०२० या नव्या कोऱ्या गाडीतून उतरून बंदुकीने फायरिंग केले. हा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद करून, इंस्टाग्राम या ॲपवर रिल स्वरूपात टाकण्यात आला होता. बघता बघता हा व्हिडिओ वाऱ्यासारखे सर्वत्र पसरल्यामुळे, या व्हिडिओची चर्चा सर्वत्र सुरू झाली.

फुलंब्री पोलिसांनाही या व्हिडिओची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, पोलिस कॉन्स्टेबल अनंत पाचंगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर संबंधित तरुणाचा शोध घेण्यात आला. मात्र तो तरुण अजूनही सापडला नाही. या तरूणाची ओळख पटली असून, बाळू गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे. या तरूण विरोधात पोलिस कॉन्स्टेबल अनंत पाचंगे यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली असून, पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झालेली आहेत.

फायरींगचा उद्देश काय?

समृद्धी महामार्गांने अनेक जिल्हे जोडले असून, दोन वेगवेगळे जिल्ह्याचे अंतर कमी केले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गांने जलद गतीने वाहतूक होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वीच नागपूर येथे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यामुळे देशभरात या महामार्गाची चर्चा सुरू असताना, आता एका तरुणाने बंदुकीतून फायरिंग केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाचा फायरिंग करण्याचा नेमका उद्देश काय होता? शॉर्ट व्हिडिओसाठीच फायरिंग केली का.? याच शोध पोलिस घेत घेऊ लागले आहे. या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर या बंदुकीची तपासणी करून, सत्यता पडताळण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शस्त्रासह स्टंटबाजी करू नका-पोलिस अधिक्षकांचे आवाहन :

सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो अपलोड करताना धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी कुणीही करू नये. तसेच शस्त्रासह फोटो काढून समाजात दहशत पसरविणाऱ्या विरोधात पोलिस कठोर कारवाई करीत आहे. आज सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये बंदुकीतून फायरिंग केलेले बाळू गायकवाड असून त्याच्या विरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तरुणांनी अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये.

प्राणघातक शस्त्रासह सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणारे कृत्य करून त्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमावर सायबरसेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची विशेष नजर असून अशा तरुणांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे कुणीही अशी स्टंटबाजी करू नये असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT