Sandeep Kshirsagar: बीड जिल्ह्याच्या माजी खासदार दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून बीडच्या राजकारणात आणि क्षीरसागर कुटुंबात पुन्हा एकदा मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाला. ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होताच आमदार संदीप क्षीरसागर हे माध्यमातून व्यक्त झाले.
'काकू, मला माफ करा' अशी भावनिक पोस्ट करत या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. काकू-नाना प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण क्षीरसागर कुटुंब एकत्र येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, पत्रिका समोर आल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट सोशल मीडियावरून आपली नाराजी जाहीर केली. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या पोस्टमध्ये 'सामाजिक एकोपा बिघडवणारी व्यक्ती' चे नाव निमंत्रण पुत्रिकेत असल्याचा उल्लेख करत अभिवादन कार्यक्रमाला येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
संदीप क्षीरसागर यांनी ती व्यक्ती कोण? निमंत्रण पत्रिकेतील नेमक्या कोणत्या नावावर त्यांचा आक्षेप आहे? ते स्पष्ट केले नसले तरी त्यांचा रोख हा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यावर असल्याची चर्चा आहे.
गेल्या दीड-दोन वर्षापासून बीड जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, विलास घुले मृत्यू प्रकरण, आरक्षणाच्या विषयावरून झालेली आंदोलन त्यातून फोफावलेला जातीय तणाव याचा संबंध आमदार संदीप क्षीरसागर यांनी निमंत्रण पत्रिकेतील 'त्या' नावाशी जोडला आहे. हे नाव खटकल्यामुळेच कौटुंबिक एकत्रिकरणाच्या या सोहळ्यापासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याची चर्चा आहे.
क्षीरसागर कुटुंबातील प्रदीर्घ राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र, केशरकाकूंसारख्या नेत्याच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने का होईना, कुटुंब एकत्र येण्याची आशा निर्माण झाली असतानाच पत्रिकेतील एका नावावरून हे नाट्य रंगल्याने बीडच्या राजकीय वातावरणात पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.
संदीप क्षीरसागर यांनी उल्लेख केलेल्या निमंत्रण पत्रिकेत नेमकी कोणाची नावे आहेत? यावर नजर टाकली तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राज्यमंत्री टोकन साहू, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साव, आमदार बसवराज पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, धनंजय मुंडे, छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता साहू, आमदार संदीप साहू, रामलाल गुप्ता, ह.भ.प. समाधान महाराज शर्मा तर संयोजक म्हणून कालिदास थिगळे, जयदत्त क्षीरसागर यांची नावे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.