Sanjay Shirsat  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : भुमरेंना लीड देत शिरसाटांनी केला मंत्री पदाचा मार्ग मोकळा..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : राज्यात रोजगार हमी व फलोत्पादन तथा संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले संदीपान भुमरे लोकसभेवर निवडून गेले. अनपेक्षितपणे त्यांना 1 लाख 35 हजारांची लीड मिळाली अन् मोठ्या दिमाखात भुमरेंची दिल्लीवारी झाली. मराठा आरक्षणावरून राज्यात विशेषतः मराठवाड्यात असलेली लाट भुमरेंच्या पथ्यावर पडली.

आठ पैकी सात लोकसभा मतदारसंघात ज्या लाटेने महायुतीचा घात केला, त्याच लाटेवर स्वार होत भुमरेंनी दिल्ली गाठली. अर्थात त्यांच्या या विजयात जिल्ह्यातील महायुतीच्या मंत्री, आमदारांचा मोठा वाटा राहिला आहे. यात सर्वाधिक मताधिक्य संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मिळवून दिले. भुमरेंना लीड म्हणजे आपल्याला मंत्रीपदासाठी लिफ्ट हे माहीत असल्याने शिरसाट यांनी जोर लावला होता.

सलग तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने शिरसाट यांची मजबुत पकड या निमित्ताने दिसून आली. राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्रीपद निश्चित समजले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शपथविधी सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी शिरसाट यांना कुटुंबासह निमंत्रितही करण्यात आले होते.

मात्र पाच वेळा पैठणमधून विजयी झालेले संदीपान भुमरे आणि सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून तीन वेळा आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांच्यामुळे ऐनवेळी शिरसाट यांची संधी हुकली. महाविकास आघाडीमध्ये हे दोघेही मंत्री असल्याने शिंदेनी शिरसाट यांना वेटिंगवर ठेवले. पण हे मंत्रीपदाचे वेटिंग तिकीट विधानसभा निवडणुक सहा महिन्यावर आल्या तरी कन्फर्म होईना.

संदीपान भुमरे यांना संभाजीनगरातून लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि शिरसाटांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. गेल्या दोन वर्षात मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यात संधी मिळण्याचे शिरसाट यांनी डझनभराहून अधिक मुहूर्त सांगितले असतील. पण दरवेळी हे मुहूर्त टळले आणि शिरसाट व त्यांच्या समर्थकांची निराशा झाली.

अर्थात मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय शिरसाट यांना मतदारंसघातील विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी देत मंत्रीपदाची कसर भरून काढली, पण लाल दिवा न मिळाल्याची सल शिरसाट यांच्या मनात कायम होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेल्या संधीच शिरसाट यांनी सोनं केलं असंच म्हणावं लागेल. सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत शिरसाट यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.

भुमरेंची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर आता त्यांना मंत्रीपद सोडावे लागणार आहे. चौदा दिवसात हे पद सोडल्यानंतर सहाजिकच पहिला दावा संजय शिरसाट यांचा असणार आहे. गेली दोन वर्ष संयम दाखवलेल्या शिरसाट यांना एकनाथ शिंदे यावेळी निराश करणार नाहीत, अशी त्यांना आशा आहे. काही महिन्यासाठी का होईना, शिरसाट यांना लाल दिवा आणि मंत्री हे बिरुद त्यांच्या नावासमोर लागणार यात त्यांच्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या समर्थकांना समाधान मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT