Sanjay Bansode News  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Bansode News : बिनखात्याचे मंत्री बनसोडेंची लातूरात दणक्यात एन्ट्री...

NCP : अजित पवारांच्या मोजक्या विश्वासू लोकांच्या यादीत बनसोडे यांनी स्थान पटकावले आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एन्ट्री झाली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्या इतर ८ सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Sanjay Bansode News) यात उदगीरच्या संजय बनसोडे यांचा देखील समावेश आहे. आज रेल्वेने लातूरात दाखल होताच, समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आकाशी रंगाचा शर्ट, त्यावर चाॅकलेटी जॅकेट अशा रुबाबात उघड्या कारमधून बनसोडे स्वागताचा स्वीकार करत होते.

खाते वाटप झाले नसल्याने (NCP) राष्ट्रवादीचे मंत्री बिनखात्याचे म्हणूनच आपापल्या मतदारसंघात परतत आहेत. (Latur) महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची लाॅटरी लागण्यात मराठवाड्यातील दोन नेते नशिबवान ठरले. एक बीडचे धनंजय मुंडे, तर दुसरे उदगीरचे संजय बनसोडे.

अजित पवारांचे कट्टर अशी या दोघांची ओळख. पहाटेच्या शपथविधीपासून ते शिंदे-फडणवीस सरकारमधील सहभागासाठी झालेल्या बंडात या दोघांनी अजित पवारांची भक्कम साथ दिली. (Marathwada) त्यामुळे पहिल्या ९ मध्ये या दोघांना स्थान मिळाले नसते तर नवलच. आता मंत्री म्हणून शपथ घेतली, बंगले मिळाले, पुर्वीचा तामझाम पुन्हा दिसू लागला. पण खाते वाटपच न झाल्याने अखेर हे बिनखात्याचे मंत्री आता आपापल्या मतदारसंघात परतत आहेत.

उदगीरचे संजय बनसोडे आज रेल्वेने लातूरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी लातूरचे प्रमुख चौक सजले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर माझे फोटो परवानगी शिवाय वापरू नका, असे बजावणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे फोटो देखील बॅनरवर होते. त्याची देखील वेगळीच चर्चा या निमित्ताने रंगली होती. शहरातील स्वागतांचा स्वीकार करत बनसोडे मतदारसंघात देखील जाणार आहेत. उदगीर मतदारसंघातून अजित पवार यांनी संजय बनसोडे यांना उमेदवारी देण्याचा यशस्वी प्रयोग गेल्या निवडणुकीत केला.

ज्या अजित पवारांमुळे आमदारकी आणि मंत्रीपद मिळाले त्यांचा शब्द बनसोडे यांच्यासाठी प्रमाण मानला जातो. अजित पवारांच्या मोजक्या विश्वासू लोकांच्या यादीत बनसोडे यांनी स्थान पटकावले आहे. त्यामुळे सध्या जरी त्यांना खाते मिळालेले नसले तरी अजित पवार त्यांना मोठी जबाबदारी देतील, अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्यावर पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून जबादारी होती. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनी बंड केले, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह नऊ मंत्र्यांकडील खाती काढून ती इतरांकडे दिली होती. तेव्हा राज्यमंत्री असलेल्या संजय बनसोडे यांच्याकडे शंभूराज देसाई यांच्याकडील गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पदाचा कारभार देण्यात आला होता.

नव्या सरकारमध्ये त्यांना कोणते खाते मिळते? याची उदगीर आणि लातूरकरांना उत्सूकता लागून आहे. लातूरसारख्या भागातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर मोठ्या नेत्यांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची प्रतिक्रिया बनसोडे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT