Eknath Shinde | Sanjay Gaikwad  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Gaikwad Suspension : एकनाथ शिंदेंकडून संजय गायकवाडांच्या निलंबनाचे आदेश? शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता

Farmer Remark Controversy: Shinde Sena MLA Faces Possible Suspension : शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असताना आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना पक्षातील नेत्यांमध्ये आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्याच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठांनी घेतल्याचे समजते.

Jagdish Patil

Buldhana News, 30 Oct : वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेले बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. या विधानाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेकडून सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. शेतकरी कुटुंबांतील महिलांना २५ हजार शिलाई मशिन्सचे, तर शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकलींचे वाटप केले जात आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागात १०० ट्रक अन्नधान्य पाठवले होते. त्यानंतर गुरुवारी आणखी २४ ट्रक धान्य रवाना करण्यात आले.

शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असताना आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्याच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठांनी घेतल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्यांच्या विषयावर बोलताना वादग्रस्त विधान केले होते. शेतकरी आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल, तर त्याने आमदार किंवा खासदारांना चिठ्ठी लिहावी. आम्ही सर्वजण मिळून त्याची मदत करू, असे ते म्हणाले होते.

शेतकरी कोणताही विचार न करता आत्महत्या करतात, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही कोणी जाऊ नये, असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील विषयावर अशा प्रकारची टिप्पणी केल्याने गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली.

आता या विधानाचे पडसाद शिवसेनेतही उमटू लागल्याचे चित्र आहे. एकीकडे पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी मदतकार्य सुरू असताना दुसरीकडे आमदाराच्या वक्तव्यामुळे पक्षाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर संजय गायकवाड यांच्यावर खरोखरच निलंबनाची कारवाई होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT