Sanjay Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray: ठाकरेंच्या खासदाराच्या मनात नेमकं काय? ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु असतानाच संजय जाधव यांचा आदित्य ठाकरेंना खास मेसेज

Sanjay Jadhav, Aditya Thackeray, Operation Tiger: ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान खासदार संजय जाधव यांनी आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून त्यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मराठवाड्यातील तीन खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, मिशन टायगर यशस्वी होणार, अशा चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांना केंद्रात मंत्रीपद देण्याचा व इतर खासदारांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचाल सुरक्षित असेल याचा शब्द देण्यात आल्याचे बोलले जाते. आॅपरेशन टायगर आणि त्या संदर्भात आमच्या पक्षांच्या खासदारांच्या सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्याशी चर्चा आणि भेटीगाठी झाल्याची कबुली आमदार अंबादास दानवे यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचे खासदार लवकरच ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार, या चर्चेला पुष्टी मिळाली.

एकीकडे आॅपरेशन टायगर आणि खासदार संजय जाधव यांच्यासह धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका कृतीने सगळ्यांनाच धक्का बसला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना जाधव यांनी वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या सोशल मिडिया अधिकृत पेजवरून संजय जाधव यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी शुभेच्छा संदेश पाठवला आहे. महाराष्ट्राच्या युवा शक्तीचे प्रेरणास्थान, दूरदृष्टीचे नेते, युवसेनाप्रमुख मा.आ. आदित्य ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या जिद्दीने, तुमच्या दूरदृष्टीने आणि जनसेवेच्या भावनेने महाराष्ट्र नेहमीच प्रगतीपथावर राहो. हा जन्मदिवस तुमच्या जीवनात नव्या यशाची, नव्या ऊर्जेची आणि अनंत यशाची सुरुवात ठरो, या मनापासूनच्या सदिच्छा असे म्हणत जाधव यांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जाधव यांच्या या शुभेच्छा संदेशानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महिनाभरापुर्वी मुंबईत परभणी जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. या बैठकीला खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली. एक नव्हे अशा दोन बैठकांना ते गैरहजर राहिल्याने त्यांच्या पक्ष सोडून जाण्याच्या चर्चेला बळ मिळाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत संजय जाधव यांनी पक्ष सोडला तर किती राजकीय नूकसान होऊ शकेल, याचा आढावा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन घेतला होता.

उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी अहवाल सादर केला होता. त्यानंतर पुन्हा मुंबईत परभणी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक ठाकरेंनी घेतली. ही बैठक होत नाही तोच परभणीच्या जिल्हाप्रमुखांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. संजय जाधव समर्थक अनेक पदाधिकाऱ्यांनी या कारवाईनंतर सामुयिक राजीनामे देत पक्षावर दबाव वाढवला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव हे पक्ष सोडून गेले, असे समजून परभणीत नव्याने संघटनात्मक बदल आणि बांधणीचे काम जोमाने घेतले होते. या कारवाईने जाधव यांनाही धक्का बसला होता.

आपण अजून पक्ष सोडलेला नाही, भविष्यात काय होईल? हे सांगता येत नाही, अशी भाषा खासदार संजय जाधव यांनी वापरल्याने उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली होती. महाराष्ट्रात शिवसेना फुटली तेव्हा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या एकनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना २०२४ मध्ये पुन्हा परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांच्याच मंत्रीमंडळात आदित्य ठाकरे मंत्री असल्याने ते नाराज होते.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना मंत्री करायला नको होते, या निर्णयामुळे महाराष्ट्रात चुकीचा संदेश गेला, असा आरोप संजय जाधव यांनी तेव्हा जाहीरपणे केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मतदारसंघातील कामे होत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी मिळत नाही, असा थेट आरोप करत संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. पक्षात असताना संजय जाधव यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी अनेकदा मतभेद झाले होते. तरी पक्षफुटीनंतर जाधव यांनी पक्ष सोडला नव्हता. आज ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार हे जवळपास निश्चित झालेले असताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT