Parbhani Lok Sabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav News : '...म्हणून मला जातीयवादाचा फायदा झाला', ठाकरेंच्या शिलेदाराच्या दाव्याने नवा वाद!

Jagdish Pansare

Parbhani Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मुंडे बहीण-भावामध्ये जातीयवादावर भडका उडाला आहे. माझ्यावर जातीयवाद केल्याचा आरोप धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह काही ओबीसी नेत्यांकडून केला जातोय, असा थेट हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून चढवला होता.

तर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर मी जातीयवादी झालो का? असा पलटवार जरांगे यांनी मुंडे व इतर ओबीसी नेत्यांवर केला. त्यात परभणीचे विद्यमान खासदार व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव(Sanjay Jadhav) यांच्या विधानाची भर पडली आहे. लोकसभेच्या परभणी मतदारसंघात संजय जाधव विरुद्ध महायुतीचे महादेव जानकर यांच्यात काँटे की टक्कर झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महादेव जानकर यांनी मतदारसंघातील वंजारी, ओबीसी मतांवर डोळा ठेवून परभणीतून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जातीयवाद डोक्यात ठेवूनच ते इथून लढले. जातीयवादाला आधी जानकरांनी सुरुवात केली, त्यानंतर मराठा समाज एकटवटला आणि त्यांनी चिडून मतदान केल्याचा दावा संजय जाधव यांनी एका मुलाखतीत केला.

जातीयवादाचा फायदा परभणीत मला आणि बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे(Bajarang Sonawane) उर्फ बाप्पांना झाल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. यावरून राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जातीयवादाचा ठपका ठेवला जात आहे, तर दुसरीकडे याच जातीयवादाचा फायदा आपल्याला निवडणुकीत झाल्याचा दावा ठाकरे गटाचे उमेदवार जाधव यांनी केला.

हा दावा किती खरा किती खोटा? हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईलच, पण त्यांच्या दाव्यातून मराठवाड्यात आणि राज्याच्या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीयवाद झाला, याला एकप्रकारे पुष्टीच दिली आहे. संजय जाधव हे परभणी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी महादेव जानकर यांना महायुतीने उमेदवारी देत जाधव यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. जानकर यांना मराठा समाजाच्या रोषाला मतदारसंघात अनेक ठिकाणी सामोरे जावे लागले होते.

जाधव यांनी जानकर यांच्यावर त्यांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढवता जातीयवादाला खतपाणी घालण्याचे काम केल्याचा आरोप केला. सुरूवात जानकरांनी केली म्हणून मराठा समाज एकवटला, मुस्लिम मतदार आमच्या बाजूने उभा राहिला असा दावा करत आपण एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला होता.

जानकर(Mahadev Jankar) यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी परभणीत मोठी शक्ती लावली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन जानकरांच्या विजयासाठी शिट्टी वाजवली होती. खान-बाण सोडा अन् विकासाच्या मुद्यावर मतदान करा, असे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांमधून केले होते. परंतु ही निवडणूक जातीयवादाच्या मुद्यावरच लढली गेली यावर चार जूनच्या निकालानंतर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT