Shiv Sena UBT News : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात यशवाडी येथे शनिवारी मोठी दुर्घटना घडली. प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोर उभारण्यात येणारा घुमट अचानक कोसळून त्यामध्ये पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमीही झाले आहे. अशा घटना घडल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी तातडीने घटनास्थळी धाव घेतात, मदतीसाठी हात पुढे करतात. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना धीर देतात, जखमींची विचारपूस करतात. मात्र, परभणीचे खासदार कुठेच दिसले नाहीत.
खासदार संजय जाधव कुठे आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यांनी या घटनेनंतर काही तासांनी केवळ सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करत प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्याचे सांगत लोकप्रतिनिधी म्हणून सोपस्कर पार पाडल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय जाधव हे काही दिवसांपासून मतदारसंघात नसल्याचे सांगितले जात आहे.
खासदार जाधव यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचाही या सहा जणांमध्ये समावेश असला तरी ते मतदारसंघातील समर्थकांशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनीच मीडियाशी बोलताना सांगितले आहे. मात्र, अन्य पाच खासदार सध्या गायब आहेत.
काय म्हणाले संजय जाधव?
संजय जाधव यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यशवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमी भाविकांना तत्काळ उपचार मिळावेत आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, अशी विनंतीही जाधव यांनी केली आहे.
दरम्यान, मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. प्रत्येक शनिवारी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होते. या ठिकाणी गर्भगृहासमोरील नव्याने घुमट उभारण्याचे काम सरु होते. पिलर उभे करण्यात आल्यानंतर घुमट उभारण्यात आला होता. शनिवारी दुपारी भाविक दर्शन घेत असताना अचानक मंदिराचा घुमट कोसळला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.