Sanjay Shirsat-Uddhav Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat: "आम्हीच मूळ शिवसेना, दुसरीकडे जाण्याची गरज नाही"; ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंच्या नेत्याची ऑफर!

Maharashtra Politics: संजय शिरसाट यांनी शिंदे गटालाच मूळ धनुष्यबाणाची शिवसेना संबोधत ठाकरे गटाला पक्षात येण्याची ऑफर दिली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाबाबतही त्यांनी पुन्हा इच्छा व्यक्त केली.

सरकारनामा ब्यूरो

Marathwada Politics News: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबतही शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान केले होते. आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चांवर भूमिका स्पष्ट केली.“आम्ही मूळ शिवसेना आहोत धनुष्यबाणाची शिवसेना आहोत. ज्यांना आमच्यात यायचे असेल, त्यांचे स्वागतच करू. आम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला थेट ऑफर दिली.

शिंदे गटाकडून शिवगड तांड्यात गोरगरीब कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. यावेळी त्यांना शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “आम्ही मूळ शिवसेना आहोत, धनुष्यबाणाची शिवसेना आहोत. ज्या कोणाला आमच्या पक्षात यायचे असेल, त्या सर्वांचे आम्ही मनापासून स्वागत करू.आम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही शिरसाट यांनी भाष्य केले. शरद पवार रुग्णालयात असताना त्यांना भेटण्यासाठी विविध राजकीय नेत्यांची लागलेली रांग ही नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देणारी असल्याचे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीतील संभाव्य घडामोडींवरही त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना दिल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने मास लीडर आहेत. त्यांनीच पुन्हा राज्याचे नेतृत्व करावे, अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा असल्याचे शिरसाट म्हणाले. आगामी काळात महिला आणि मुलींना सायकली, शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार असून ग्रामीण भागात स्वखर्चातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘अडवाणींच्या रथयात्रेमुळेच भाजपची भरभराट’

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त संजय शिरसाट यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अडवाणी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या योगदानामुळे भाजपला देशात सत्ता स्थापन करता आली, असे ते म्हणाले. अडवाणी यांनी काढलेल्या राम जन्मभूमी रथयात्रेमुळेच भाजपच्या विस्ताराला मोठी चालना मिळाली, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT