

Thane News : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे (Pradeep Purnekar Murder Case) चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्या मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांना राजकीय पातळीवर दुहेरी धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणानंतर पक्षांतर्गत दबाव वाढल्याने त्यांना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच आता त्यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला (Thane Diwali Pahat Programme) उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. त्यामुळे मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
मिनाक्षी शिंदे या ठाण्यातील शिवसेनेच्या प्रभावशाली महिला नेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. मात्र, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच पोलिसांनी मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षातील त्यांची राजकीय कोंडी झाल्याची चर्चा आहे.
यंदा नेत्यांची अनुपस्थिती
मिनाक्षी शिंदे यांच्याकडून दरवर्षी ठाण्यातील चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दरवर्षी या कार्यक्रमाला भेट देत तरुणांशी संवाद साधत असतात.
मात्र, यंदा रविवारी (८ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. पक्षातील कोणताही प्रमुख नेता, नगरसेवक किंवा पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यक्रमाला भेट दिली नाही. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीबाबत यंदा दुष्काळाचे सावट असल्याने त्यांनी कोणत्याही दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थिती लावली नसल्याचे कारण देण्यात आले. मात्र, पक्षातील इतर नेत्यांनीही मिनाक्षी शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने या अनुपस्थितीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
अवघ्या १०० मीटर अंतरावर युवा जल्लोष
एकीकडे मिनाक्षी शिंदे यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली असताना, दुसरीकडे ठाण्यात युवा जल्लोष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र चव्हाण, महापौर शर्मिला पिंपलोलकर यांच्यासह अनेक नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या.
विशेष बाब म्हणजे, युवा जल्लोष सोहळ्याचे ठिकाण आणि मिनाक्षी शिंदे यांच्या चिंतामणी चौकातील दिवाळी पहाट कार्यक्रमाचे ठिकाण यांच्यात अवघे १०० मीटर अंतर होते. तरीही शिवसेनेच्या एकाही नेत्याने किंवा नगरसेवकाने त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यामुळे पक्षातील नेत्यांनी मिनाक्षी शिंदे यांच्यापासून अंतर राखल्याची चर्चा रंगली आहे.
पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर पक्षांतर्गत नाराजी
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे चर्चेत आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे यांच्या शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी राजीनामा देण्यास उशीर केल्याची नाराजीही पक्षातील काही नेत्यांनी व्यक्त केली होती. तोपर्यंत पक्षाची प्रतिमा खराब झाली होती, अशी भावना काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली होती. आता दिवाळी पहाट कार्यक्रमाला पक्षातील प्रमुख नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने मिनाक्षी शिंदे यांच्याबाबत शिवसेनेत नाराजी कायम असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या राजकारणात नेमके काय बदल होत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.