DCM Eknath Shinde-MLA Santosh Bangar Kawad Yatra News Sarkarnama
मराठवाडा

MLA Santosh Bangar Kawad Yatra : 'बम भोले'.. आमदार संतोष बांगर यांचे कावड यात्रेतून जोरदार शक्तिप्रदर्शन! एकनाथ शिंदेही भारावले

Santosh Bangar's Kawad Yatra garnered major attention this year with Maharashtra DCM Eknath Shinde attending for the third year in a row. हिंगोली जिल्ह्यात तरुण वर्ग या कावड यात्रेच्या निमित्ताने संतोष बांगर यांच्याशी जोडला गेला आहे. या तरुणाईच्या जोरावरच संतोष बांगर यांनी सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

Jagdish Pansare

Hingoli News : शिवसेनेचे कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांची कळमनुरी ते हिंगोली औंढा नागनाथ पर्यंतची कावड यात्रा मराठवाड्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 2016 पासून सुरू झालेल्या या कावड यात्रेची राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चा होत असते. कधी कावड यात्रेत तलवार फिरवली म्हणून तर कधी आमदार संतोष बांगर यांनी 'बम भोले' म्हणत केलेल्या तांडव नृत्यावरून ते चर्चेत असतात.

राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले संतोष बांगर (Santosh Bangar) कायम वादग्रस्त राहिले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बांगर यांची गाडी जरा अधिकच जोमात होती. अधिकाऱ्यांना धमकावणे, रुग्णालयातील पेशंटचे बिल कमी करण्यासाठी डॉक्टरांना फोनवरून दम देणे, हॉस्टेलमध्ये जाऊन प्राचार्यांना कानफटवणे अशा अनेक प्रकरणातून आमदार संतोष बांगर गेल्या दोन वर्षात राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले.

मात्र शिवसैनिक असाच असतो, नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत असेच वागणार असे ठामपणे सांगत बांगर यांनी ही आपली 'स्टाईल' असल्याचे वारंवार सांगितले. संतोष बांगर यांच्या राजकीय जीवनात कावड यात्रेचे महत्त्व आणि योगदान राहिले आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात तरुण वर्ग या कावड यात्रेच्या निमित्ताने संतोष बांगर यांच्याशी जोडला गेला आहे. या तरुणाईच्या जोरावरच संतोष बांगर यांनी सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

आता मी सुधारलो..

एकनाथ शिंदे यांच्या बंडात ऐनवेळी सहभागी झाल्यानंतर बांगर यांच्यावर सातत्याने गद्दारीचा आरोप केला गेला. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला चितपट करत बांगर यांनी आपल्यावरील गद्दारीचा शिक्का पुसला. बांगर यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि आक्रमक स्वभावामुळे एकनाथ शिंदे अनेकदा अडचणीत आले. राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचाच पक्षाचा आमदार धमकावतो, मारहाण करतो आणि वादग्रस्त विधाने करतो यामुळे शिंदे यांना जाब विचारला जायचा.

यावर कायदा हातात घेऊ नका, अशी समज शिंदेंकडून बांगर यांना वारंवार देण्यात आली. त्याचा काहीसा परिणाम बांगर यांच्यावर झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात संतोष बांगर हे कुठल्याही वादाशिवाय मतदारसंघात काम करत असल्याचे दिसते. कळमनुरी ते हिंगोली औंढा नागनाथ दरम्यान काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेला सलग तिसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांनी काल हजेरी लावली. यावरून शिंदे यांचे बांगर यांच्यावर असलेले प्रेम अधोरेखित होते.

एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित हजारो शिव भक्तांसमोर बांगर यांनी जोरदार भाषण केले. शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांना अनेकदा कावड यात्रेसाठी यावं लागतं, अशी विनंती वारंवार केली. पण ते मात्र काही आले नाही. शंकर भगवानचा तिसरा डोळा उघडला आणि काय झालं? हे तुम्ही पाहत आहात. माझ्यामागे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे शंकर भगवानाचा आशीर्वाद आहे. त्यांच्या मनातील सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतील, असं साकडे मी महादेवाला घातला आहे असं म्हणत संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

एकनाथ शिंदे यांनी आपल्याला लोकांना प्रेमाने जिंका हा दिलेला सल्ला आपण ऐकला आणि त्यामुळे त्यांना त्रास होईल असे कुठलेही कृत्य आपल्याकडून झालेले नाही. यापुढेही ते होणार नाही, असा शब्द संतोष बांगर यांनी यावेळी दिला. कावड यात्रेला जमलेला हजारो तरुणांचा समुदाय पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भारावून गेले. शिवसेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि सामान्य शिवसैनिकाच्या पाठीशी आपण उभे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. एकूणच आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेने मराठवाड्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT