
Mumbai News, 02 Aug : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे दोन्ही नेते मागील दोन दिवसांपासून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं दिसत आहे.
दोघांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असतानाच आता राजन विचारे यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने केलेल्या कारवाईवर भाष्य करताना राजन विचारे म्हणाले होते की, "अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का? पहलगाम आपल्या देशात आहे, पाकिस्तानमध्ये नाही. या घटनेला शंभर दिवस झाले, सत्तावीस कुटुंब उध्वस्त झाली.
आणि एवढ्या दिवसांनी जर दहशतवादी पकडले जात असतील तर मोठा डंका वाजवण्याची काय गरज?", असा सवाल करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. याच वक्तव्यावरून म्हस्केंनी त्यांच्यावर टीका केली होती. म्हस्केंच्या या टीकेला राजन विचारे यांनी पत्राद्वारे प्रतिउत्तर दिलं आहे.
त्यांनी पत्रात लिहिलं की, मी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत नरेश म्हस्के यांनी पराचा कावळा केला. माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या वाचाळ टिकेवर राष्ट्रभक्ताचं हे प्रत्युत्तर. वाचाळवीर हीच उपाधी तुम्हाला योग्य आहे. आमच्यावर काँग्रेसच्या वळचणीला गेल्याचे टीका करतो, पण एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून मागरिट अल्वा यांच्या उपस्थितीत ठाण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तुझा काँग्रेस प्रवेश होणार होता.
पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे तुला काँग्रेसमध्ये जाण्यापासून मी थांबवला आणि म्हणूनच तुझी आजची ओळख आहे हे विसरू नकोस. याचे भान ठेव, असं म्हणत विचारे यांनी थेट म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते आणि तेपण एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून असा मोठा दावा केला आहे.
तुझ्यासारख्या लबाडाने खासदारकीची निवडणूक कशी जिंकली हे सर्वांना माहीत आहे. बोगस मतदान नोंदणी करून विजय मिळवलात याचाही भंडाफोड लवकरच होईल. तेव्हा दिल्लीत असताना चामोगिरी करताना सर्व ठिकाणी कॅमेरे लागले आहेत त्यामुळे याचे ही भान ठेव. घरापासून ते संसद भवनापर्यंत कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत.
दिल्ली तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे उगाच आमच्या वाटेला जाऊ नकोस. मातोश्री, उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल बोलताना जरा जपून. तुला एकच सल्ला देतो की, सुसंस्कृत राजकारण कर. मला तुझे पुस्तक उघडायला लावू नकोस, नाही तर भारी पडेल. तूर्तास एवढंच !
दरम्यान, याच पत्रात त्यांनी करोना काळात उंदरासारखा घरातल्या बिळात लपलेला तू, ठाण्यातील मनसेच्या नेत्याने डिवचल्यावर घराबाहेर पडला होतास. गद्दारी नसानसामध्ये भिनलेल्या तुझ्यासारख्यांनी आम्हाला देशभक्तीचे धडे देताना मी आजवर केलेल्या कामाची नुसती यादी आठव, म्हणजे तुला कळेल, गद्दार कोण आणि देशप्रेमी कोण ते? अशा शब्दात त्यांनी नरेश म्हस्केंवर हल्लाबोल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.