BJP News : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया, टोळ्या आणि त्या चालवणाऱ्या नेत्यांच्या नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मीक कराडसह अटकेत असलेल्या आठ उमेदवारांचे कारनामे समोर येत असतानाच सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या भाईगिरीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. भाजपाच्या भटक्या विमुक्त युवा आघाडीचा राज्य उपाध्यक्ष आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक म्हणून 'खोक्या'ओळखला जातो.
खोक्याच्या करारनाम्याच्या व्हिडिओमुळे भाजपाची (BJP) डोकेदुखी दिवसेंदिवस वाढते आहे. आमदार सुरेश धस यांनाही स्पष्टीकरण देतादेता तोंडाला फेस येऊ लागला आहे. अखेर सतीश भोसले उर्फ खोक्या हा आमचा नव्हेच, असा खुलासा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. भाजपा भटक्या विमुक्त युवा आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष पदावरून भोसलेची 2021 मध्ये हकालपट्टी करण्यात आली होती, अस आता स्पष्ट करण्यात आले आहे. भाजप भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी हा खुलासा केला आहे.
काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा सतीश भोसले याचा शिरुरमधील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Suresh Dhas) या प्रकरणी सतीश भोसलेसह 4 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर भोसले याचे आणखी काही व्हिडिओ समोर आले होते. कारमध्ये पैसे फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहे. हाता सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यात साखळ्या आणि बोटात अंगठ्या घातलेल्या खोक्याच्या व्हिडिओची सध्या राज्यभरात होत आहे.
सतीश भोसले बीडच्या शिरूर शहराजवळीस पारधी वस्तीवर राहतो. मित्रांसोबत लॅविश लाईफ जगणारा भोसले काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभागी असून भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची खोक्या पार्टी नावाने दहशत असून गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर तो ओळखला जातो. लेबर काॅन्ट्रॅक्टर असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याने प्रचंड माया जमवल्याचे बोलले जाते.
सतीश भोसलेने भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भटक्या विमुक्त युवा आघाडी राज्य उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र घेतले होते. सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे. तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. भटके विमुक्त प्रवर्ग हा वेगळा आहे. तरीदेखील त्याने चुकीची माहिती सांगून पद मिळवले होते. हे कळल्यानंतर 2021 मध्ये त्याची पदावरून हकालपट्टी केली होती.
त्यानंतर तो पक्ष विरोधी कारवाई, खंडणी, अपहरण असे प्रकार करत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्याच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देखील घेतला होता. सध्या तो कुठल्याही पदावर नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे भाजपाचे भाजप भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव खोक्या भाजपाचा सदस्य नसल्याचे व त्याची पक्षातून चार वर्षापुर्वीच हकालपट्टी केल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे आमदार सुरेश धस मात्र तो आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली देत आहेत. त्यामुळे नेमका खोक्या भाजपमध्ये आहे की नाही? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.