Sandip Kshirsagar News  Sarkarnama
मराठवाडा

Sandip Kshirsagar News : घर पेटवल्याच्या घटनेवरुन आमदार क्षीरसागरांचा खळबळजनक दावा ; " योग्यवेळी पुराव्यानिशी..."

Maratha Reservation News : " मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली..."

Deepak Kulkarni

Beed News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (ता. ३०) जिल्ह्यात हिंसक वळण लागले. शासकीय मालमत्तांसह नेत्यांची घरे जाळण्याच्या आणि दगडफेकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक व वाहने जाळण्यासह माजलगाव येथील नगरपालिकेला आग लावली.

यानंतर बीड शहरात देखील आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्या घरासह राष्ट्रवादी भवनला पेटवल्याच्या घटना घडल्या.या घटनेनंतर पहिल्यांदाच आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सोमवारच्या जाळपोळीच्या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, बीड शहरात सोमवारी अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुलं, पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते. पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

क्षीरसागर म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली.अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्यवेळी पुराव्यानिशी बोलणार असल्याचेही आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टमध्ये केली आहे.

" मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली..."

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने या बाबतीत तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यायला हवा.

सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला आहे. तसेच शासन दरबारी पत्राद्वारे ही मागणी देखील केली होती.ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार असल्याचा उच्चारही आमदार क्षीरसागरांनी यावेळी केला.

जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी बीडच्या रस्त्यांवर...

शहरात दगडफेक आणि आगीच्या घटनांमुळे परिस्थिती अटोक्याबाहेर गेली. यानंतर रात्री आठ वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर फौजफाट्यासह शहरातील रस्त्यांवर उतरले. या तिघांची सुभाष रोडवर चर्चा झाली व यानंतर तातडीने संचारबंदीची सूत्रे हालली.

फडणवीसांचा थेट इशारा...

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागले. बीडमध्ये दोन आमदारांच्या आणि शासकीय कार्यालयाची जाळपोळ झाली. बीडमधल्या राष्ट्रवादी भवनाचीही तोडफोड झाली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सकारात्मक आहोत, मात्र हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT