Former MLA Shankar Anna Dhondge meets Maharashtra Deputy CM Eknath Shinde in Mumbai, sparking political discussions about a possible Shiv Sena entry ahead of key regional realignments. Sarkarnama
मराठवाडा

Shankar Anna Dhondge : माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे घेणार धनुष्यबाण हाती, मुंबईत एकनाथ शिंदेंची घेतली भेट!

Dhondge Political Move : माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना वेग आला असून नांदेडच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.

Jagdish Pansare

Nanded Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहा-कंधारचे माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरअण्णाआ धोंडगे तेलंगणाच्या बीआरएसमधील प्रवेश फसल्यानंतर आता शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहेत. नांदेड जिल्ह्यात राजकीय ताकद आणि शेतकऱ्यांमध्ये प्रभाव असलेले नेते म्हणून धोंडगे ओळखले जातात. काँग्रेस पक्षानेही त्यांच्या प्रवेशासाठी गळ टाकला होता. परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सत्ताधारी पक्षात जाणेच योग्य ठरेल, अशी त्यांच्या समर्थकांची भावना असल्याचे बोलले जाते.

नुकतीच शंकरअण्णा धोंडगे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल होत असले तरी अद्याप शिवसेनेतील प्रवेशाचा निर्णय झाला नसल्याचे धोंडगे यांच्याकडून सांगीतले जात आहे. लवकरच कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

शंकरअण्णा धोंडगे हे 2009 ते 2014 दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते. शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षात काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्षही काढला होता. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगणा राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात धोंडगे यांनी प्रवेश केला होता. या पक्षाची पहिली सभाही धोंडगे यांच्या नेतृत्वाखालीच नांदेडमध्ये झाली होती. तिथून तेलंगणातील हे गुलाबी वादळ मराठवाड्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यात पसरले.

परंतु तेलंगाणा विधानसभा निवडणुकीतच बीआरएसचा दारूण पराभव झाला. त्यानंतर केसीआर यांचा अपघात झाला आणि ते काही महिने घरातच होते. या सगळ्याचा परिणाम बीआरएसच्या महाराष्ट्रातील विस्तारावर झाला. पक्षातील सर्वच प्रमुख नेते पक्ष सोडून गेल्याने ज्या वेगाने बीआरएसचे गुलाबी वादळ महाराष्ट्रात आले होते, त्याच वेगाने ते शांतही झाले. तेव्हापासून शंकरअण्णा धोंडगे नव्या पर्यायाच्या शोधात होते.

काँग्रेससोबतही झाली होती बैठक..

मध्यंतरीच्या काळात काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही शंकरअण्णा धोंडगे यांची भेट घेऊन त्यांच्यासह दोन पुत्रांना काँग्रेस प्रवेशाची आॅफर दिली होती. पण समर्थकांनी सत्ताधारी पक्षातच गेलं पाहिजे, असा सूर आळवला. त्यानंतर धोंडगे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.

धोंडगे पुर्वी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, त्या पक्षाचे जिल्ह्यातील नेते म्हणून आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे कार्यरत आहेत. धोंडगे यांचे ते विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनाही शह द्यायचा असेल तर सत्ताधारी पक्षातच जायला हवे, असा मतप्रवाह त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. शिंदे यांची धोंडगे यांनी घेतलेली भेट हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT