bajrang sonwane sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonwane : लोकसभेला अंधारात कोणी कोणी काय केले ते पक्षाला सांगणार; बजरंग सोनवणेंचा रोख कोणावर?

Datta Deshmukh

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व निष्ठावंत, शरद पवारांवर प्रेम करणारे आणि विधानसभेसाठी इच्छुक आणि भावी आमदार अशी आपल्या भाषणाची विनोदी सुरुवात करणाऱ्या खासदार बजरंग सोनवणे यांनी विधानसभा उमेदवारीसाठी आपण कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात नाही, पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांना निवडून आणणार, असा निर्धार केला.

लोकसभेला कोणी काय केले, रात्री कुठे होते व दिवसा कुठे होते. आमच्याच गाडीतून रात्री कोणाला फोन लावत होते, कोणाच्या भावाने, पत्नीने काय केले हे सगळं पक्षाला सांगणार आहे. या सर्व गोष्टींचा पुरावे आपल्याकडे आहेत, असे म्हणत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांचे बजरंग सोनवणे यांनी चांगलेच 'टेन्शन' वाढविले आहे.

त्यांचा नेमका रोख कुणावर आहे, याबाबत पक्षाच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्यासमोरच बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत पक्षाच्या कोण्या एखाद्या नेत्याने विरोधकांशी हातमिळवणी केल्याचे सांगून टाकत आता विधानसभेला संबंधितांच्या वाटेत गतिरोधक उभारला आहे.

जयंत पाटील यांच्या उपास्थितीत बीड येथे निष्ठवंतांचा मेळावा आणि विधानसभा इच्छुकांच्या आढावा बैठका झाल्या. यावेळी बोलताना बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane ) यांनी वरील कळीचा मुद्दा काढला.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पराभूत करून बजरंग सोनवणे खासदार झाले. भाजपकडे प्रचारात मंत्री, आमदार, खासदार, अनेक माजी आमदार व इतर बड्या नेत्यांची फळी होती. तुलनेत बजरंग सोनवणे यांचा बाजूने नेत्यांची संख्या कमी होती. मात्र, मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने त्यांचा विजय झाला.

त्यातही पक्षाच्या काही नेत्यांनी विरोधकांशी अंधारातून संधान साधल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फक्त पक्षाच्या कानात बोलून चालणार नाही. लोकसभेला कोणी काय केले ते आपण पक्षाच्या लक्षात आणून देणार असल्याचे बजरंग सोनवणे म्हणाले. त्यामुळे आता पक्षात 'तो' कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT