शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शिल्पाराणी वाडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मोठा राजकीय धक्का दिला.
त्यांच्या या पक्षांतरामुळे छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीत तणाव आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाडकरांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील शिवसेना आणि भाजपमधील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.
Chhatrapati Sambhajinagar News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील फोडाफोडीच्या राजकारणाला अक्षरश: ऊत आला आहे. महायुतीतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये तर यासाठी स्पर्धा लागली आहे. नाराजी, बहिष्कारास्त्र, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना तंबी मिळाल्यानंतरही एकमेकांचे नेते, पदाधिकारी फोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनाच पक्षात प्रवेश देत दणका दिला आहे.
शिवसेनेच्या माजी नगरसेविका तथा महिला जिल्हाप्रमुख राहिलेल्या शिल्पा राणी वाडकर यांनी काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर पत्र व्हायरल करत आपण वैयक्तिक कारणामुळे शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी त्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, भाजप पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण संभाजीनगरमध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला होता.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात विधानसभा लढलेल्या राजू शिंदे यांचीही या निमित्ताने भाजपमध्ये घरवापसी झाली. त्याचवेळी शिल्पा राणी वाडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र नेमकं त्याचवेळी मुंबईत शिवसेनेच्या मंत्र्यांनी या फोडाफोडीच्या राजकारणावरुन मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी नाराजीचे कारण सांगितले होते. त्यामुळे वाडकर यांचा भाजप प्रवेश तेव्हा थांबला होता. मात्र फोडाफोडी राज्यभरात सुरूच आहे. त्यामुळे आज भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते शिल्पा राणी वाडकर यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.
वाडकर यांनी काही महिन्यापुर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा देत संजय शिरसाट यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्या सातत्याने शिरसाट यांच्यासोबत पक्ष, संघटनेच्या कामात वावरताना दिसल्या. परंतु मध्यंतरीच्या काळात काही वाद झाल्यामुळे शिल्पा राणी वाडकर या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच त्यांनी सोशल मिडियावर पत्र पोस्ट करत आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर त्यांचा लांबलेला भाजप प्रवेश आज शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते वाडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांसोबतच काही महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी देखील पक्ष प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीत काही प्रभागांमध्ये राजकीय समीकरण बदलू शकतात, अशी चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपाने मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे.
त्या शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या.
अधिक राजकीय संधी आणि विकास क्षेत्रातील कामासाठी त्यांनी भाजपची निवड केल्याचे सांगितले जाते.
शिवसेना-भाजप युतीत विशेषतः संभाजीनगरमध्ये तणाव वाढल्याचे संकेत आहेत.
महत्वाच्या महिला नेतृत्वाचे पक्षांतर झाल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसत आहे.
भाजपला महिला वर्गात बळ मिळू शकते, तर शिवसेनेचे स्थानिक समीकरण डळमळू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.