Chhatrapati Sambhajinagar : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून तब्बल सव्वा लाखांहून अधिक मताधिक्क्याने विजयी झालेले महायुतीचे खासदार संदिपान भुमरे यांनी आज बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. जनतेच्या कल्याणासाठी साकडे घालत त्यांनी प्रार्थना केली.
त्यानंतर महामंडलेश्वर जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराज ( Shantigiri Maharaj ) यांच्या आश्रमात जाऊन भुमरे यांनी त्यांचेही आशीर्वाद घेतले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील एकमेव छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर महायुतीला यश मिळाले. उर्वरित सातही मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाली.
संभाजीनगरात संदिपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांची लढत 'एमआयएम'चे इम्तियाज जलील व शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांच्याशी होती. निवडणूक पूर्व सर्वे मध्ये संदिपान भुमरे तिसऱ्या क्रमांकावर राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी नंतर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
तर, संदिपान भुमरे तब्बल एक लाख 35 हजार मताधिक्याने विजयी झाले. त्यांची लढत 'एमआयएम'च्या इम्तियाज जलील यांच्याशी झाली होती. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भुमरे यांनी आज वेरूळला जाऊन घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी संस्थांनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भुमरे यांनी थेट शेजारीच असलेल्या शांतिगिरी महाराजांच्या मठाकडे आपला मोर्चा वळवला.
निवडणुकीआधी भुमरे यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेऊन आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. अगदी इम्तियाज जलील, हर्षवर्धन जाधव यांनीही तेव्हा शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन पाठिंबा देण्यासाठी साकडे घातले होते. मात्र, शांतिगिरी महाराजांनी आपला आशीर्वाद रुपी पाठिंबा संदिपान भुमरे यांना दिल्याचे बोलले जाते.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पाठिंबा दिल्याबद्दल शांतिगिरी महाराजांचे आभार मानण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद कायम राहावा म्हणून भुमरे यांनी त्यांचे दर्शन घेत आभार व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या आणि त्यानंतरच्या मतमोजणी दरम्यान अनेक उमेदवारांनी देवदर्शन घेत विजयासाठी साकडे घातले होते. चंद्रकांत खैरे यांनी विजयासाठी यज्ञही केला होता. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.
संदिपान भुमरे यांनी तेव्हा खैरे यांच्या यज्ञ आणि पूजेवर टीका केली होती. "यज्ञ केल्याने कोणी निवडून येत नसते," असा टोला भुमरे यांनी खैरे यांना लगावला होता. मी देखील देवाचे दर्शन घेतो, देवाला मानतो असे सांगत भुमरे यांनी एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आपण विजयी होणार असल्याचा दावा केला होता. निवडणूक निकालानंतर चंद्रकांत खैरे पराभूत झाले तर संदीपान भुमरे प्रचंड मतांनी निवडून आले. त्यानंतर आज घृष्णेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी घेतलेल्या दर्शनाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.