Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दोन नेत्यांच्या वादात आपला राजकीय फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेतील दोन नेत्यांमध्येही जुंपल्याचे पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून खैरे-दानवे यांच्यातील वर्चस्ववाद चांगलाच उफाळून आला आहे. या वादाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पद्धतशीरपणे हवा देण्याचे काम सुरू केले आहे.
चंद्रकांत खैरेंवर (Chandrakant Khaire) दररोज आरोप करणाऱ्या संजय शिरसाट यांच्या तोंडून त्यांच्यासाठी कौतुकाचे बोल बाहेर पडू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. खैरेंची निष्ठा, प्रामाणिकपणा, पक्षवाढीसाठीचे योगदान या सगळ्या गोष्टी शिरसाट यांना आता पटायला लागल्या आहेत. अंबादास दानवे हे शिंदेसेनेत जाणार अशी चर्चा काही महिन्यापुर्वी राजकीय वर्तुळात होती. तेव्हा अंबादास दानवे यांच्या प्रवेशाला शिरसाट यांचा विरोध होता.
आता खैरे-दानवे वादानंतर संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासाठी आपल्या पक्षाची दारे खुली आहेत, असे सांगत एकदा नव्हे तर तिसऱ्यांदा पक्षप्रवेशाची आॅफर दिली आहे. तिकडे जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी मात्र नेमकी शिरसाट यांच्याविरुद्ध भूमिका घेत खैरे यांना कुठल्याही परिस्थितीत शिंदेसेनेत एन्ट्री दिली जाणार नाही. पालकमंत्री काय म्हणतात, मला माहित नाही, खासदार म्हणून मी हे सांगतोय असं भुमरे सध्या ठणकावून सांगतायेत.
दारुवाला टीका झोंबली..
लोकसभा निवडणुकीत खैरे विरुद्ध भुमरे हे एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. मराठवाड्यातील आठ पैकी एकमेव छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीने भुमरे यांच्या रुपात जिंकली होती. लाखाहून अधिकचे मताधिक्य घेऊन भुमरे यांनी खैरेंना तिसऱ्या क्रमांकावर ढकलले. चारवेळा खासदार राहिलेल्या खैरेंचा सलग दुसरा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. निवडणुक प्रचारा दरम्यान, खैरे आणि त्यांच्या पक्षाने संदीपान भुमरे यांच्या दारुच्या दुकानांचा मुद्दा प्रचारात प्रमुख अस्त्र म्हणून वापरला होता.
यावर स्पष्टीकरण देताना भुमरे यांच्या तोंडाला चांगलाच फेस आला. सातत्याने दारुवाला अशी टीका चंद्रकांत खैरे यांच्याकडून त्यावेळी केली. भुमरेंनी वीस वर्षात पैठणची कशी वाट लावली? हे ही खैरे मेळावे, प्रचार संभामधून सांगत होते. दारुवाला ही टीका संदीपान भुमरे यांना तेव्हा चांगलीच झोंबली होती. शिवाय खैरे-दानवे वादातही खैरे यांनी संदीपान भुमरे यांना ओढत त्यांनी लोकसभेला आपल्याविरोधात अंबादास दानवे यांच्यासोबत सेटिंग केल्याचा आरोप नुकताच केला. एवढेच नाही तर भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीत 120 कोटी रुपये वाटल्याचा दावाही केला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे संजय शिरसाट दररोज खैरे यांना पक्षप्रवेशासाठी टाळी देत आहेत, तर भुमरे त्यांना शिवसेनेत घेण्यास विरोध करत आहेत. मुळात खैरे यांनी आपण मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे वारंवार स्पष्ट केले असतांना शिरसाट-भुमरे त्यांना पक्षात घेण्यावरून का भांडतायेत? असा प्रश्न पडतो. खैरे-भुमरे हे शिवसेनेत गेल्या 30-35 वर्षांपासून सोबत काम करत होते. मग भुमरे यांनी नुसत्या खैरेंच्या शिंदेसेनेतील प्रवेशाच्या आॅफरचा एवढा धसका का घेतला? याचीही चर्चा होताना दिसते.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.