Chhatrapati Sambhajinagar Politics : राजकारणात संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर तुटून पडणारे नेते आनंदाच्या आणि दु:खाच्या प्रसंगात मात्र नेहमी एकत्र येताना दिसतात. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक संबंध, मैत्रीपूर्ण संबंध वेगळे असं सगळेच सांगतात. असाच काहीसा अनुभव सध्या छत्रपती संभाजीनगरकरांना येतोय. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, एमआयएमचे सर्वेसर्वा बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी, माजी खासदार इम्तियाज जलील हे एकाच वेळी एकाच ठिकाणी येण्याचा योग आला.
इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचे चिरंजीव बिलाल यांचा नुकताच विवाह झाला. काश्मीर येथे थाटात विवाह संपन्न झाल्यानंतर शहरातील एका हाॅटेलमध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. खास व्हिआयपींसाठी असलेल्या या स्वागत समारोहात राज्यभरातील सर्वपक्षीय नेते, मंत्री, आमदार, खासदार सहभागी झाले होते. जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक आणि प्रतिस्पर्धी अशी ओळख असलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही या स्वागत समारंभाला आवर्जून हजेरी लावली.
विशेष म्हणजे खैरे जेव्हा या स्वागत समारंभात पोहचले त्याच वेळी तिथे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे देखील उपस्थित होते. इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि ओवेसी या तीन नेत्यांना एकाच फ्रेममध्ये टिपण्याची मग स्पर्धा लागली आणि मोबाईलचे फ्लॅश पडू लागले. या तीनही नेत्यांमध्ये यावेळी हास्यविनोदही झाला. एकमेकांना हस्तांदोलन करत मग खैरे यांनी ओवेसी, इम्तियाज जलील यांचा निरोप घेतला.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव केला आहे. 2019 आणि 2024 या दोन्ही निवडणुकीत हे दोघे एकमेकाविरुद्ध लढले होते. इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला हादरा देत 2019 मध्ये खैरे यांचा पराभव केला होता. तर 2024 मध्ये शिवसेनेच्या फुटीनंतर खैरे-भुमरे-इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत झाली. मत विभाजनामुळे खैरे यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
जिल्ह्याच्या राजकारणात इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे हे अनेकदा एकमेकांच्या विरोधात आमने-सामने आले होते. खैरे हे कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शहरात जेव्हा जेव्हा तणावाचे किंवा हिंदू -मुस्लिम वादाचे प्रसंग उद्भवले तेव्हा तेव्हा खैरे यांनी आक्रमक भूमिका घेत इम्तियाज जलील व त्यांचा पक्ष एमआयएम वर टोकाची टीका केलेली आहे. मात्र हे सगळं विसरून इम्तियाज जलील यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभात खैरे सहभागी झाले. राजकारण आणि वैयक्तिक संबंध मैत्री वेगळी असते हेच त्यांनी दाखवून दिले.
काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. विशेष म्हणजे धर्म विचारून फक्त हिंदूना दहशतवाद्यांनी टार्गेट केल्याचे पिडितांच्या कुटुंबियांनी जाहीरपणे सांगितले. यावरून देशात राजकारण सुरू असतांना इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र राजकीय नेत्यांमधील भाईचारा दिसून आले. चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे दुसरे नेते अंबादास दानवे व इतर राजकीय पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी इम्तियाज जलील यांच्या कौटुंबिक आनंदाच्या सोहळ्यात सहभाग घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.