ZP Election News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम्हाला डांबून ठेवले, आमचा सौदा केला. अध्यक्ष पदासाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी अठरा कोटींचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणारे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि अंबादास दानवे आज समोरासमोर येणार आहेत. निमित्त आहे झेडपीतील विविध सभापती पदांसाठीच्या निवडीपूर्वीची आढावा बैठक.
शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे 9 सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेच्या राजकीय डावपेचात बहुतांश सदस्यांनी आपण सत्तेत गेलं पाहिजे, अशी भावना नेते अंबादास दानवे यांच्याकडे बोलून दाखवली होती. त्या दृष्टीने अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी सेटिंगही केली होती. त्यासाठी त्यांनी सर्व नऊ सदस्यांना ठिकाण बदलत सहलीवर पाठवले होते.
दरम्यान, भाजपाने दोन्ही शिवसेनेचा डाव उधळत ठाकरेंच्या पक्षाचे दोन सदस्यही पळवले. यापैकीच एक असलेल्या संजय निकम यांनी अंबादास दानवे यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनीच आम्हाला डांबून ठेवले, परस्पर आमचा सौदा केला, अध्यक्षपदासाठी 18 कोटींचा व्यवहार केला असे गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
आज अंबादास दानवे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात सर्व सदस्यांची बैठक बोलावली. या बैठकीला संजय निकम हे हजर झाले आहेत. अंबादास दानवे यांनी आमच्यावर गद्दारीचा आणि पळून गेल्याचा आरोप सिद्ध केला, तर मी देखील त्यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करेल, असे म्हणत ठाम भूमिका घेतली. संजय निकम आणि ललिता सोनवणे या दोन नेत्यांनी सहलीवर असतानाच धूम ठोकत भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना संजय निकम यांनी थेट अंबादास दानवे यांच्यावर कोट्यावधीचा व्यवहार केल्याचा आरोप केल्याने ते दानवे समर्थकांच्या हिटलिस्टवर आहेत.
संजय निकम आणि ललिता सोनवणे हे दोन्ही सदस्य अंबादास दानवे यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहणार असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे. या कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निकम, सोनवणे यांच्याबाबतीत कुठलाही गैरप्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. आता बैठकीत नेमकं काय घडतं? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.