Shivsena V/S Shivsena News : शिवसेना फुटीचा रंजक इतिहास आजही राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणात चर्चिला जातो. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापुर्वी निम्मी शिवसेना फुटली. मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी ताकद या बंडाला मिळाली. या बंडाळीसाठी आमदारांना खोके, मंत्रीपदाची आॅफर दिली गेली. पण या अमिषाला बळी न पडता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदारांमध्ये विधानसभेच्या कन्नड मतदारसंघाचे उदयसिंह राजपूत यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
आपल्याला फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, पैशाने भरलेली बॅग घेऊन एक कार आपल्या पेट्रोल पंपावर आली होती, पण आपण गद्दारी केली नाही, असे स्वतः राजपूत यांनी स्पष्ट केले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा पैकी एकमेव कन्नडचे आमदार राजपूत (MLA Udaysingh Rajput) सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहेत. शिंदेंची साथ न देण्याची किमंत त्यांना मोजावी लागली, असा आरोप राजपूत वारंवार करतात.
जिल्हा नियोजन समितीच्या एका बैठकीत तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर मतदारसंघाला निधी न देता माझ्यावर मी शिंदे यांच्यासोबत न गेल्याचा सूड उगवला जात आहे, असा आरोप उदयसिंह राजपूत यांनी हातातली फाईल सभागृहात भिरकावत केला होता. पंचवीस वर्षाच्या प्रयत्नानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उदयसिंह राजपूत शिवसेनेकडून लढले आणि आमदार झाले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील हे खासदार झाले होते. याबद्दलच्या पश्चातापाचे पडसाद त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत असे काही उमटले की जिल्ह्यातील सर्व नऊ जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या. (Kannad) यात सर्वाधिक सहा जागा एकट्या शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या. मात्र सत्तेसाठी झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होणे आणि त्यातून पक्ष फुटीचे ग्रहण अशा अनेक राजकीय घडामोडींचा मोठा परिणाम झाला.
शिवसेनेचे जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार असताना कन्नडचा आमदार आपल्यासोबत नाही, याची सल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिंदे संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी कन्नडची जागा आपल्याला जिंकायची आहे असे सांगत या मतदारसंघाची जबाबदारी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवली होती. आमदार उदयसिंह राजपूत यांना घेरण्यासाठी एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार यांनी फिल्डींग लावली आहे.
अशावेळी उदयसिंह राजपूत निष्ठेच्या जोरावर कन्नडची जागा पुन्हा राखतात? की मग महायुती इथे यश मिळवते? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. काँग्रेस, जनता पार्टी, मनसे, अपक्ष आणि शिवसेना अशा अनेक राजकीय पक्षांना संधी देणारा कन्नड हा विधानसभा मतदारसंघ आहे. काकासाहेब भिकनराव, नारायण पाटील, टी.एस. पाटील, रायभान जाधव, किशोर पाटील, नितीन पाटील, नामदेव पवार, हर्षवर्धन जाधव आणि आता उदयसिंह राजपूत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.