Shivaji Maharaj Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यासह देशभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. शिवप्रेमींकडून आग्रा येथील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती.
तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांनीही पाठपुरावा केल्यानंतरही शिवजयंती (Shivjayanti) साजरा करण्याला पुरातत्व विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादला शिवप्रेमींकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आहे.
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आग्र्यातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी मिळावी म्हणून 11 नोव्हेंबर 2022 पासून प्रयत्न करण्यात येत होते. यात स्वत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना शिफारस पत्रही दिलं होतं. मात्र, त्याला देखील पुरातत्व विभागाने उत्तर दिले नाही. एवढंच नाही तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांची तीनवेळा भेटही घेतली. तरीही परवानगी नाकारली.
गेल्या दीड महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाकडून चालढकल होत असल्याने अखेर शिवप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली असून औरंगाबादला शिवप्रेमींकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकामध्ये शिवप्रेमींची निदर्शनं करण्यात आली. यावेळी आग्रा येथे शिवाजी महाराजांच्या जयंतीला परवानगी न मिळाल्याचा निषेध, पुरातत्व विभाग आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली.
औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि युवराज संभाजी यांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवलं होतं. मात्र,शिवाजी महाराजांनी अत्यंत चलाखीनं औरंगजेबाच्या हातावर तुरी देत आग्य्रातून सुखरूप सुटका करुन घेतली होती. या घटनेला उजाळा मिळावा या उद्देशाने लाल किल्ला परिसरात शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा करण्याची परवानगी मागितली होती.
मात्र, आग्रा किल्ला परिसरात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. एवढंच नाही तर अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. ज्यांचा ऐतिहासिक संबंध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासिक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली असा संतप्त सवाल अंजिक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.