Latur News : राज्य व देशाच्या राजकारणात सहा दशके तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून आपला वेगळा ठसा निर्माण करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. 13) वरवंटी (ता. लातूर) येथे त्यांच्या शेतात शासकीय इतमामात, मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
तसेच पोलिस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन मानवंदना दिली. दिवंगत चाकूरकर यांचे शुक्रवारी (ता. 12) निधन झाले होते. शनिवारी सकाळी सकाळी 'देवघर निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाला पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरवात झाली. फुलांनी सजविलेल्या रथातून त्यांचे पार्थिव औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्हीआर चौकमार्गे वरवंटी येथे त्यांच्या शेतामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी शोकाकुल वातावरणात शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चाकूरकर यांनी सहा दशकांच्या राजकीय, सामाजिक जीवनात प्रामाणिकपणे देशाची सेवा केली. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी भरीव योगदान दिले. संसदीय परंपरेला नवा आयाम दिला. संसदीय समित्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. राजकारणातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दांत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मुलगा शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे, खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खासदार डॉ. भागवत कराड, रजनी पाटील, डॉ. अजित गोपछडे, डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, संजय बनसोडे, अभिमन्यू पवार, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पंजाब पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक इंदरवीर सिंग, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, सीईओ राहुल कुमार मीना, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनीही चाकूरकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार बी.आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, बब्रुवान खंदाडे, धीरज देशमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.