Santosh Bangar Controversial  Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar Controversial : आधी मिशी, फाशी अन् आता उपाशी; आमदार बांगरांची गाडी थांबेचना!

Jagdish Pansare

Santosh Bangar Controversial Statement : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा एका शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. राजकारणात मोठ-मोठे दावे करणारे बांगर, आपल्याला मतदान करावं म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे आग्रह धरावा, प्रसंगी दोन दिवस उपाशी राहावे, असा अजब - गजब सल्ला देताना दिसले. यामुळे आमदार बांगर यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठत आहे. (Latest Marathi News)

आमदार बांगर यांच्या या अजब-गजब वक्तव्याने समाज माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला तर जे बांगर यांना जे जवळून ओळखतात त्यांनी त्यांचे हे विधान हसण्यावारी नेले. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांच्यावर याच विधानामुळे रडण्याची वेळ आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायम वाद, धमकावणे, नको ती आव्हाने देणे, यामुळे आमदार बांगर चांगलेच प्रकाशझोतात आले. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजावून सांगितल्यावरही शिवसैनिक असाच आक्रमक असतो, असे म्हणत त्यांनी आपला कार्यक्रम सुरूच ठेवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण आपल्या राजकारणासाठी थेट शाळेतल्या लहान विद्यार्थ्यांनाच वापरण्याचा हा प्रकार जरा अतीच झाला. लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सत्ताधारी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेसाठी मिशन 48 शिवसंकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री विरोधकांना आव्हान देत आहेत. तर आपले काय म्हणत? त्यांचे आमदारही विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार बांगर यांनी अंगणवाडी, आशा सेविकांना साड्या वाटपांचा कार्यक्रमही घेतला होता.

त्यानंतर आज शाळेतील विद्यार्थ्यांना मला मतदान करायला सांगा, आई-वडीलांनी ऐकले नाही तर दोन दिवस उपाशी राहीन सांगा, असे आव्हान करत बांगर यांनी हात जोडले. गंमतीचा भाग म्हणून याकडे पहायचे म्हटले, तरी मुळात बांगर यांच्यावर अशी विनवणी करण्याची वेळ का आली? याचा विचार होणेही गरजेचे आहे. विकासकामे, मतदारंसघाचा सर्वांगीण विकास, पायाभुत सुविधा, आरोग्य, शिक्षण या विषायवर लोकप्रतिनिधींनी मतं मागणे अपेक्षित असते. पण बांगरांना कदाचित याचा विसर पडला असावा. शिवसेना पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बांगर यांना आपली पुढील राजकीय वाटचाल कठीण वाटू लागली आहे की काय? असाच त्यांच्या विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनातून अर्थ निघतो.

कायम चर्चा.. पण -

आमदार संतोष बांगर हे कायम चर्चेत असतात. बाळासाहेबांचा शिवसैनिक असं मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या बांगर यांनी आपल्या तडाख्याने अनेकांना सरळ केले. त्यांच्या या आक्रमकपणामुळे त्यांच्या अडचणीत अनेकवेळा वाढ झाली, पण शिवसैनिक असाच असतो, गोरगरिबांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकवणारच, असंही ते ठणकावून सांगतात. मतदारसंघात त्यांचा मोठा चाहतावर्गही आहे. श्रावण महिन्यात मतदारसंघातून औंढानागनाथपर्यंत काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेमुळे ते चांगलेच चर्चेत असतात.

कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका आणि यात्रेत उघडपणे तलवार फिरवल्यामुळेही ते वादात सापडले आहेत. पण याची बांगर कधीही पर्वा करीत नाहीत. राज्यात शिवसेनेत बंड झाले तेव्हा, मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन मतदारसंघात परतलेल्या बांगर यांच्यावर शिवसैनिकांनी अक्षरशः फुलांचा वर्षाव करीत त्यांना डोक्यावर घेतले. तेव्हा अगदी डोळ्यात अश्रू आणत संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंची साथ कधी सोडू नका, असे आवाहन शिवसैनिकांना केले होते. पण ढसाढसा रडणारे बांगर अचानक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले, याबद्दल त्यांच्या समर्थकांनीही तेव्हा आश्चर्य व्यक्त केले होते.

त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, कानाखाली आवाज काढण्याची भाषा, वसतिगृहात जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण करणे, असे प्रकार त्यांच्याबाबतीत अनेकदा घडले आहेत. विरोधकांना आव्हान देणे आणि चर्चेत राहणे हा जणू त्यांचा छंदच. अतिउत्साहाच्या भरात दिलेली आव्हाने आणि ती पूर्ण न केल्यामुळे तोंडघशी पडण्याची वेळही संतोष बांगर यांच्यावर अनेकदा आली आहे. 2024 मध्ये मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर मी जाहीर फाशी घेईन, हे बांगर यांचे चॅलेंज असेच चर्चेत आले होते.

त्याआधी कळमनुरी या आपल्याच मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सगळ्या जागा निवडून आणल्या नाही, तर मिशा काढीन, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले होते. बाजार समिती हातची गेल्यानंतर मात्र त्यांची फजिती झाली होती. पण बांगरांची गाडी अशी काही सुसाट सुटली आहे, की थांबायलाच तयार नाही. आता विद्यार्थ्यांना मतासाठी उपाशी राहण्याचा सल्ला दिल्यानंतर, पुढचा टप्पा काय असेल? याकडे बांगर यांचे हितचिंतक डोळे लावून आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT