Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : संभाजीनगरची जागा आमचीच, पण उमेदवार कोण हे आताच सांगणार नाही...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election: संभाजीनगरची जागा कोण लढवणार? यावरची सुरू असलेल्या चर्चांचा आता सर्वसामान्यांना कंटाळा आला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट हे दररोज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संभाजीनगरची जागा शिवसेनेची आहे आणि ती आम्हीच लढवणार, हे वारंवार सांगत आहेत. मात्र, उमेदवार कोण असेल? यावर ते मौन धारण करून आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Shivsena Candidate )

शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंची (Chandrakant Khaire) तर एमआयएमने इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांची उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवातही केली आहे, तर दुसरीकडे या जागेवरून महायुतीचे अजूनही दावे-प्रतिदावे सुरू आहेत. संभाजीनगरचा उमेदवार ठरत नाही, तर तिकडे हिंगोलीचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली मुंबईत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या पत्रकार परिषदेतून फारसे काही हाती लागलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन-अडीच वर्षांपासून संभाजीनगरातून लोकसभा (Lok Sabha) लढवण्यासाठी तयारी करत असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनीही आता आशा सोडली आहे. मुंबई आणि दिल्लीत युतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आग्रह कायम असल्याने कराड आता मला पक्षाने खूप काही दिले आहे असे म्हणत सायलेंट मोडवर गेले आहेत.

शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) स्वतः किंवा त्यांचा मुलगा विलास (बापू) भुमरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून शक्ती पणाला लावत आहेत. आमदार संजय शिरसाट यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांचेही प्रयत्न चालवले आहेत. या सगळ्या प्रक्रियेपासून लांब असलेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांनीही नितीन पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली असली तरी त्यांच्या नावाला पक्षातून विरोध असल्याचे बोलले जात आहे. एकूणच स्पर्धा मोठी, पण उमेदवारावर एकमत होत नसल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे संजय शिरसाट आज तरी संभाजीनगरच्या उमेदवाराबद्दल काही संकेत देतील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे, तर भाजपच्या जिल्ह्यातील नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांची दिल्लीत भेट घेण्याच्या तयारीत असून, तिथे एक घाव दोन तुकडे करण्याचा निर्धार बोलून दाखवत आहेत.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT