Om Raje Nimbalkar and MP Kailas Patil Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार कैलास पाटलांची अभेद्य जोडी

Shivsena UBT PM Om Raje Nimbalkar and MLA Kailas Patil : खासदार ओमराजे निंबाळकर व धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील ही अभेद्य जोडी गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.

Shital Waghmare

Dharashiv Political News: राजकारणात एकाच पक्षात, एका जिल्ह्यात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींमधील मतभेद अनेकदा चव्हाट्यावर येतात. अगदी हमरीतुमरी आणि एकमेकांची उणेदुणे काढणारे नेते सहज सापडतात. परंतु याला धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे निष्ठावंत खासदार, आमदार अपवाद ठरले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर व धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील ही अभेद्य जोडी गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहेत.(Dharashiv Politics )

धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील जिल्हा परिषद निवडणुकीत डावलल्यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले आणि त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजीमुळे कैलास पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तेव्हा त्यांनी धनुष्यबाण हातात घेतला. जिल्हा परिषद जिंकली आणि शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदही पटकावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कैलास पाटील यांच्यासाठी विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेतली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी मातोश्रीवर राजकीय वजन वापरले. विधानसभेची उमेदवारी मिळण्यापासून ते आजतागायत खासदार निंबाळकर यांचा कैलास पाटील यांच्या चढत्या राजकीय आलेखामध्ये मोठा वाटा आहे.

खासदार व आमदार हे सध्या शोले चित्रपटातील जय-वीरूप्रमाणे मैत्रीसंबंध जपत राजकीय वाटचाल करीत आहेत. दोघांचाही शेतकरी केंद्रीत प्रश्नांवर सभागृहात सरकारवर भडीमार असतो. दुसरीकडे भाजप या मतदारसंघात हालचाल करण्यास धजावत नसल्याने पाटील पुन्हा आमदार होणार की, भाजप सक्रिय होवून आपला उमेदवार निवडणुकीत उतरवून विजयी करणार? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीत घुसमट होत असलेल्या जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील यांना शिवसेना पक्षात जिल्हाप्रमुख आणि आमदार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील हे सध्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. राज्यात शिवसेना पक्ष फुटला, यात धाराशिव जिल्ह्यातील स्वतःला निष्ठावान म्हणणाऱ्या अनेकांनी या बंडात उडी घेतली. मात्र ओमराजे व कैलास पाटील ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले.

शिंदे गटाच्या बंडातून अर्ध्या प्रवासातून कैलास पाटील परतल्याचा प्रसंग आजही चर्चिला जातो. धाराशिव जिल्ह्यात बंडा नंतर ओमराजे आणि कैलास पाटील हे दोघेच ठाकरे गटाची ओळख म्हणून शिल्लक राहिले आहेत. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे जिल्ह्याला तानाजी सावंत यांच्यासारखा पालकमंत्री लाभला. आपल्या ताकतीच्या जोरावर जिल्ह्यातील उरली सुरली ठाकरे सेना संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पण खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यातील समन्वय, मैत्रीपूर्ण संबंध आणि धोरणात्मक निर्णयावर एकमत या जोरावर त्यांनी जिल्ह्यातील ठाकरे गटाची ताकद आणि अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पक्षात मोठी फूट पडली असली तरी जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी ओमराजे पाटील यांची जोडी निष्ठेच्या ताकदीवर सत्ताधाऱ्यांशी लढा देत आहे. नवीन कार्यकर्त्यांची जमवाजमव, शाखा स्थापन, युवासेना, शिवसेना अशा गावोगावी शाखा काढण्याची मोहीम वर्षभरापासून सुरू आहे.

लवकरच लोकसभा, विधानसभेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती व त्यापूर्वी नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील पक्षीय बलाची तुलना करावयाची झाल्यास भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची ताकद अधिक वाढली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर ठाकरे सेना आणि शेवटी काँग्रेस,असे चित्र आहे.

असे असले तरी धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांप्रती अधिकच चांगले प्रश्न सरकारपुढे मांडू लागल्याने ते पुन्हा चर्चेत आहेत. दुसरीकडे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे राज्य सरकार, केंद्र सरकारच्या योजना आणि प्रकल्पांसाठी पाठपुरावा करून प्रमुख कामांसाठी आपण पाठपुरावा करीत असल्याची जाणीव जनतेला करून देत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला. आता ते पुन्हा केव्हा येणार आणि आपल्या निष्ठावंत खासदार-आमदार जोडीच्या पाठीवर कौतुकाची थाप देत लढ म्हणणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

भविष्यात ठाकरे गटाच्या या खासदार-आमदार जोडी पुढे मोठे आव्हान असणार आहे. स्वतःचा मतदारसंघ सोडला तर आमदार कैलास पाटील यांचा अन्य विधानसभा मतदारसंघात फारसा प्रभाव नाही. अन्य मतदारसंघ हे सध्या महायुतीकडे आले आहेत. सगळे आमदार मातब्बर असल्याने त्यांना भविष्यातील राजकीय करिअर अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

कळंब धाराशिव मतदारसंघात आजही आमदार राणाजगजितसिंह पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे. ग्रामपंचायत व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाने लक्षवेधी कामगिरी केली आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी एकटी पडली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता सध्या भाजपच्या वाटेवर आहे. त्यांचा भाजपप्रवेश झाला तर काँग्रेस विरोधाला सुध्दा उरणार नाही, एवढी वाईट स्थिती होणार आहे. दुसरीकडे सेना खासदार-आमदाराची जोडी अभेद्य असली तरी त्याचा मतरूपी किती लाभ होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT