Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : बीडमध्ये ठाकरे गटाला सुरुंग; 'सामना'तून नियुक्तीची घोषणा अन् इकडे 53 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Datta Deshmukh

Beed News : शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी ते मैदानात उतरले असून पक्षात नव्या चेहर्यांना आणून त्यांनी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे.आता बीड जिल्ह्यातही ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

जिल्ह्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सध्या रस्सीखेच सुरु आहे. सामनातून नियुक्त्यांची घोषणा झालेल्या पदाधिकाऱ्यांना त्याच दिवशी गळाला लावण्यात शिवसेना (Shivsena) जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांना यश आले. परळी, अंबाजोगाई, वडवणी व माजलगाव तालुक्यातील ठाकरेंच्या 53 पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देत शिवसेनेत (उबाठा) प्रवेशाची घोषणा केली.

सोमवारी परळीत पत्रकार परिषदेत शिवसेनेचे (ठाकरे गट) परळी विधानसभा प्रमुख राजा पांडे व केज विधानसभा समन्वयक दत्ता बोडके यांनी राजीनाम्याची घोषणा केली. विशेष म्हणजे या दोघांची नुकतीच शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून नियुक्तीची घोषणा झाली होती.

मागील काही महिन्यांपासून शिवसेनेत (उबाठा) मोठी उलथापालथ सुरु आहे. मागच्या महिन्यात जिल्ह्यातील संघटनात्मक बदलानंतर पदाधिकाऱ्यांनी उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर आरोपांचे बॉम्ब फोडायला सुरुवात केली आहे. शिवसेनेही अशा काही पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मंगळवारी माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप हे समर्थकांसह मुंबईत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. तर, आता इकडे शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनीही शिवसेनेला (उबाठा) सुरुंग लावला आहे.

परळी, अंबाजोगाई, माजलगाव व वडवणी तालुक्यातील शिवसेनेच्या (उबाठा) ५३ पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याची घोषणा सोमवारी परळीत सचिन मुळूक यांच्या उपस्थितीत बैठकीत केली. परळीचे व्यंकटेश शिंदे, आंबेजोगाईचे गजानन मुंडेगावकर व माऊली गोंडे यांनी सुषमा अंधारेंवर पुन्हा आरोप करत ठाकरे यांना शत्रूंची आवश्यकता नाही, सुषमा अंधारे एकट्याच उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)ना संपवायला पुरेशा असल्याचा घणाघात केला.

सर्व पदाधिकारी शिवसेनेत (शिंदे गट) सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. 12) जानेवारीला प्रवेश करणार आहेत.या राजीनाम्यांमुळे शिंदे गटाची बीड जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. तर ठाकरे गटासाठी आगामी निवडणुकांच्या धर्तीवर ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT