ambadas danve chandrakant khaire sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : खैरे-दानवेंचे तुणतुणे सुरूच; म्हणे दोघेही इच्छुक..

Jagdish Pansare

Chattrapti Sambhajinagr News : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोघांनी उमेदवारीवर दावा केला आहे. प्रसार माध्यमासमोरच या दोघामध्ये ताणाताणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फोनवरून त्यांना समज दिली होती. पण बुधवारी पुन्हा संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोरच खैरे-दानवे यांचे तुणतुणे सुरूच होते.

अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे मी इच्छूक आहेच, असे म्हणत अंबादास दानवे यांनी आपण अजूनही माघार घेतलेली नाही, हे स्पष्ट केले. तर खैरे यांनी मात्र संयम दाखवत आमचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे असे, म्हणत ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करावे लागेल, असा सूचक इशाराही दिला.

मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही इच्छूकांना घेऊन वेरुळच्या घृष्णेश्वराचे आणि खुलताबादच्या भद्रा मारोतीचे दर्शन घेऊन नाक घासणी करायला लावली होती. मात्र आज पुन्हा माध्यमासमोर या दोघांनी तोच सूर आळवला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचा संभाजीनगरचा उमेदवार ठरला आहे. चंद्रकांत खैरे हेच इथून लढणार आहेत. जिल्ह्यातील स्थानिक नेते, पदाधिकारी खासगीत हे बोलूनही दाखवतात. परंतु अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही, अशावेळी आधीच आपले पत्ते उघड करून विरोधकांना संधी द्यायची नाही, अशी रणनिती ठाकरे गटाने ठरवली आहे. त्यामुळे माध्यमासमोर खैरे-दानवे यांच्याकडून आमच्यात वाद असल्याचे खोटे-खोटे चित्र निर्माण केले जात असल्याचीही चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून दिल्लीत गोंधळ सुरू आहे. महाविकास आघाडी येत्या दोन दिवसात आपले उमेदवार जाहीर करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच 48 मतदारसंघातील उमेदवार फायनल झाले आहेत. याची कल्पना दानवे-खैरे यांनाही आहे. परंतु सध्या त्यांचा स्क्रीपटेड वाद सुरू असल्याची टीका होतांना दिसते आहे.

खैरे यांचा गेल्या निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय यापुर्वीच झाला होता. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमाशी बोलतांना अंबादास दानवे (ambadas Danve) हे आमचे राज्यातील नेते आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून ते उत्तम काम करतायेत, असे सांगत ते उमेदवार नाहीत, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस खैरे-दानवे यांचे उमेदवारीवरील दावे ठरल्याप्रमाणे सुरूच राहतील, असे दिसते.

(Edited By : Sachin Waghmare )

SCROLL FOR NEXT