Raju Waghmare meet chandrakant khaire sarkarnama
मराठवाडा

ShivsenaUBT News : राजू शिंदे चंद्रकांत खैरेंच्या गटात ? उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होताच घेतली भेट

Jagdish Pansare

ShivsenaUBT: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही समर्थकांसह पक्ष प्रवेश केला होता. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात राजू शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पण हे करत असताना 'राजू तुझे स्वागत पण गटबाजीत अडकू नको', असा जाहीर सल्ला दिला होता.

उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पक्षातील गटबाजीवर थेटपणे बोलत खैरे यांनी खळबळ उडवून दिली. ठाकरे मुंबईला रवाना झाल्यानंतर आज (सोमवारी) राजू शिंदे यांनी थेट चंद्रकांत खैरे यांच्या डेक्कन फ्लोअरमिल भागातील निवासस्थानी धाव घेत त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बरीच चर्चा झाल्याचे समजते.

राजू शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाला चंद्रकांत खैरे chandrakant khaire यांचा विरोध होता अशी चर्चा आहे. शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याची माहिती आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पश्चिम मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची खैरे यांची इच्छा होती.

लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव झाल्यानंतर खैरे पश्चिम मधून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. पण राजू शिंदे यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता खैरे यांच्या पुनर्वसनाचा मार्ग बंद झाल्याचे दिसते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ सहन करणार, अशी प्रतिक्रिया राजू शिंदे यांच्या प्रवेशापूर्वी खैरे यांनी दिली होती.

शिवाय शिवसंकल्प मेळाव्यात केलेल्या भाषणातून खैरे यांनी राजू शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेत Shivsena प्रवेश केला असता तर मी निवडून आलो असतो. राजू शिंदेंनी लोकसभेला गद्दार संदीपान भुमरे यांना 25 हजार मतांची लीड दिल्याचेही खैरे म्हणाले होते. एवढेच नाही तर पक्षात प्रवेश केला, तुझे स्वागत आहे, पण गटबाजीत अजिबात अडकू नको, असा सल्लाही खैरे यांनी राजू शिंदे यांना जाहीरपणे दिला होता..

आगामी विधानसभा निवडणुकीत पश्चिममधून विजय मिळवायचा असेल तर चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी नेत्याची नाराजी परवडणार नाही. हे ओळखून पक्ष प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी थेट खैरेंचे घर गाठत त्यांची भेट घेतली. दोघांच्या या भेटीत बरीच चर्चा झाल्याचे समजते.

खैरे यांच्या मनात कोणाताही किंतू-परंतु राहू नये, याची काळजी राजू शिंदे यांनी या भेटीत घेतल्याचे बोलले जाते. खैरे यांनी गटबाजीत अडकू नको असा सल्ला देऊन 24 तास उलटत नाही तोच राजू शिंदे त्यांच्या घरी पोहचल्याने ते खैरेंच्या गटात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT