Dasara Melava Rally News  Sarkarnama
मराठवाडा

Dasara Melava Rally News : अब्दुल सत्तारांची दुसऱ्यांदा फजिती !

Abdul Sattar News : मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात गर्दी जमणार का?

Chetan Zadpe

Abdul Sattar News : शिवसेनेतून बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांनी पहिल्या दसऱ्या मेळाव्यात शिवतीर्थ मैदान हिसकावून घेण्यापासून ते गर्दी जमविण्यापर्यंत सर्वच बाबतीत हिरिरीने सहभाग घेतला होता. त्यावेळेस मोठी गर्दी जमवून शिवसेना आपलीच दाखविण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामध्ये मराठवाड्यातील सर्वच आमदार आघाडीवर होते. त्यामध्ये राज्याचे पणन व अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून हजारो लोक नेले होते. मात्र, त्यावेळेस सत्तार यांनी खोटे बोलून नागरिकांची गर्दी जमा केली असल्याचे पुढे आले होते, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे अडचणीत आले होते. (Latest Marathi News)

आता शिवसेनेच्या दुसऱ्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री सत्तार यांच्यावर मेळाव्याला गर्दी जमवण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, त्यात सत्तार यांना अपयश आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात गर्दी जमणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असून, दसरा मेळाव्याला आझाद मैदानावर मोठी गर्दी जमा करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

आझाद मैदानावर होत असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी पेटलेले आंदोलन, त्यात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री, आमदार, खासदारांना गावबंदीची केलेली घोषणा याचा मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी गर्दीत दसरा मेळावा साजरा करण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मेळाव्याला गर्दी जमवण्याची मोठी जबाबदारी सोपवली होती. गेल्या दसरा मेळाव्याला मुंबईत सर्वाधिक गर्दी ही अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून झाली होती. त्यांनी त्यावेळेस मतदारसंघातून दोनशेपेक्षा अधिक बसमधून मतरसंघातील नागरिकांना मुंबईमध्ये आणले होते. या मतदारसंघातील नागरिकांकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, त्यांना खोटे बोलून मुंबईत आणले असल्याचे पुढे आले होते. काही जणांना मुंबईला चला घरकुल देतो, तर काही जणांना वेगवेगळी कारण सांगत खोटे बोलून आणल्याचे पुढे आल्याने मंत्री अब्दुल सत्तार यांची नाचक्की झाली होती.

शिवसेना शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर होत असून, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवली होती. मात्र, यावेळेसही मंत्री अब्दुल सत्तार तोंडघशी पडले आहेत. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजार लोक नेण्याचा दावा त्यांनी केला होता. सत्तार यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी दोनशे बस बुक करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात १४० मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. त्यांच्या मतरसंघातील लोक मेळाव्याला जाण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याने दोनशेपैकी ६० बस रद्द करण्याची वेळ सत्तारांवर आली.

मंत्री सत्तार यांच्यावर २०० बसची जबाबदारी असताना त्यांना ६० बस नागरिक जमा होत असल्याने रद्द कराव्या लागल्या आहेत. दुसरीकडे १४० बस जेमतेम अर्ध्या भरल्या आहेत. त्यामुळे या अर्ध्या भरलेल्या बसच मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. त्यामुळे ७ ते ८ हजार जणच मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते.

मराठा आरक्षणासाठी पेटलेले आंदोलन, त्यात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री, आमदार, खासदारांना गावबंदीची केलेली घोषणा याचा मोठा फटका अब्दुल सत्तार यांना बसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना मोठी गर्दी जमा करण्यात अपयश आले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT