Jalna Maratha Andolan  Sarkarnama
मराठवाडा

Beed Band : मराठा समाज आक्रमक; बीडमध्ये कडकडीत बंद, बीड-जालना एसटी सेवा बंद

Datta Deshmukh

Beed News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला शुक्रवारी गेवराई तालुक्यात बंद पाळून उत्स्फुर्त पाठिंबा दिला. त्यानंतर रात्री अंतरवाली (ता. अंबड) येथे आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे समाज बांधवांत संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज शनिवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान, लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्री कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर टायर जाळण्यात आले. (Shutdown in Beed to protest the lathi attack in Jalana)

जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर अंबड तालुक्यातील अंतरवाली येथे मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनादरम्यान मनोज यांनी आक्रमक पवित्रा घेत एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा असे जाहीर केले आहे. दरम्यान, बीडहून जालन्याला जाणारी एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे

त्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. याला पाठिंबा म्हणून शुक्रवारी गेवराई शहरासह तालुक्यातील उमापूर, सिरसदेवी, तलवाडा आदी मोठ्या गावांमध्येही बंद पाळण्यात आला. बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला.

या दरम्यान शुक्रवारी सायंकाळी अचानक पोलिसांकडून आंदोलकांवर आश्रू धुराच्या नळकांड्या फोडत, अमानुष लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर बीड जिल्हाधिकाऱ्यांना लाठीचार्जचा निषेध नोंदवत आंदोलनाला पाठिंबा देण्याचे निवेदन देण्यात आले.

लाठीचार्जच्या निषेधार्थ शनिवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. रात्री आठनंतर बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद होत्या. शनिवारीही ही वाहतूक बंदच होती. जिल्ह्यातील आठरा पगड जाती धर्मातील बांधवांनी बंदला प्रतिसाद देऊन शांततेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT