Latur Congress Sarkarnama
मराठवाडा

Latur Congress : लातूरच्या मेळाव्यात हिंगोलीच्या जागेवरून घोषणाबाजी...

Loksabha Election : मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री दिलीपराव देशमुखांकडे.

Jagdish Pansare

Latur Congress : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल लातूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात अनेक घडामोडी घडल्या. लातूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे केली, तर ठाकरे गटाकडे असलेली हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी मेळाव्यासाठी आलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर घोषणाबाजी केली. त्यामुळे या विभागीय बैठकीत आढावा कमी आणि मागण्याच जास्त करण्यात आल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात मराठवाड्यातील काही मतदारसंघामध्ये अदलाबदल केली जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यात प्रामुख्याने ठाकरे गटाकडे असलेली हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसने मागितली आहे. त्याऐवजी जालना लोकसभेची जागा ठाकरे गटाला देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे.

या मागणीचे पडसाद कालच्या विभागीय मेळाव्यातही उमटले. या मेळाव्यात हिंगोलीची जागा काँग्रेसला देण्याबाबत घोषणाबाजी करण्यात आली. मात्र काँग्रेसचे प्रभारी व प्रदेशाध्यक्ष यांनी नारेबाजी करून दबावतंत्र नको, पक्षकार्य करा, शक्तिप्रदर्शन नको, असे प्रकार खपवून घेणार नाही, असे म्हणत पदाधिकाऱ्यांना शांत करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच हिंगोलीला लवकरच विशेष निरीक्षक पाठवून आढावा घेतला जाईल, असेही सांगण्यात आले. तसेच जिल्हाध्यक्षापेक्षा तालुकाध्यक्षाचे कार्य मोठे असून ग्राम, बुथ, प्रभाग, वाॅर्ड अशा समिती तत्काळ पूर्ण करा, अशी तंबी नेत्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बैठकीत दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी कधी होते, याकडे लक्ष आहे.

लातूर लोकसभेत आता 'फिक्सिंग' नाही...

दरम्यान, मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लातूरमध्ये मोठ्या मताधिक्याने पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र आता तिसऱ्यांदा पराभव नको, म्हणून काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील काळात 'देशमुखबंधूंच्या' भाजपाप्रवेशाच्या अनेक वावड्या उठवण्यात आल्या होत्या.

त्यामुळे लातूर येथेच विभागीय मेळावा का घेण्यात आला ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. तरीही विभागीय बैठकीतील वातावरण पाहता काँग्रेसने ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची स्थिती मजबूत असताना ही जागा जिंकण्यासाठी लढण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या अन्य ठिकाणी मेळावा घेणे शक्य होते.

मात्र, लातूरला ही संधी देण्यात आली. लातूर येथून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील राजकारणाचे समीकरण बदलण्याची ताकद येथील नेत्यांमध्ये आहे. राज्यात अनेक काँग्रेसचे नेते, आमदार भाजपमध्ये प्रवेश करीत असताना देशमुखबंधूंच्या नावाचीही काही काळ चर्चा झाली होती. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका जाहीर सभेत नाव घेत देशमुखांच्या भाजपप्रवेशाचा दावा केला होता.

मात्र ही केवळ चर्चा होती, हेही काँग्रेसने विभागीय मेळावा लातुरात घेऊन दाखवून दिले. आता राजकीय फिक्सिंग चालणार नाही, असा संदेशही पक्षश्रेष्ठींनी लातूरच्या या मेळाव्यातून दिला आहे.

(Edited by Amol Sutar)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT