Parbhnai : संपूर्ण राज्यात पडसाद उमटलेल्या परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. 16 डिसेंबर 2024 रोजी परभणीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली असताना त्यांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू नसून पोलीसांनी केलेला खून आहे, बेदम मारहाण केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप विविध संघटना आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केला होता.
शवविच्छेदन अहवालातही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते. (Parbhani) या प्रकरणाचा तपास सीआयडीने करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. अखेर साडेतीन महिन्यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगत सूर्यवंशी कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे.
सोमनाथ सूर्यंवशी यांना मारहाण करणाऱ्या आणि त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या (Police) पोलीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. परभणी हिंसाचार प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा सुरुवातीला सरकारच्या वतीने करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात बेदम मारहाणीत हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला असून आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान परभणी हिंसाचार प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषी पोलिसांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे .सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशी करण्यात आली होती. या चौकशीचा साडेचारशे पानांचा गोपनीय अहवाल मानव अधिकार आयोगाकडे पाठवण्यात आला. या अहवालात 70 पोलिसांवर मारहाणीचा ठपका ठेवण्यात आला आहे.मानव अधिकार आयोगाने त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी या सर्वांना नोटीस जारी केली होती.
10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती. यानंतर परभणीत उसळेला हिंसाचार रोखण्यासाठी पोलीसांनी बळाचा वापर केला होता. अश्रूधुराचे नळकांडे, लाठीचार्जही यावेळी करण्यात आला होता. यात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीतच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.