
Nagpur News, 20 Dec : परभणीमध्ये एका मनोरूग्णाने संविधानाचा अवमान केल्याच्या घटनेनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचारात उसळला होता. यावेळी काही आंदोलकांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं होतं. शिवाय अनेक गाड्या देखील फोडण्यात आल्या होत्या, याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि कॉम्बिंग ऑपरेशन केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला होता. तर या प्रकरणी अटकेत असलेले आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याच सर्व प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सभागृहात बोलताना दिली.
त्यांनी ही घटना नेमकी कशामुले घडली आणि त्यावर पोलिसांनी काय अॅक्शन घेतली आणि खरंच कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं का? सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला का? यावर सविस्तर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, परभणीच्या प्रकरणा दत्तराव सोपानराव पवार वय 47 नावाच्या एका माणसाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकात्मक प्रत ठेवली होती, त्याची त्याने तोडफोड करत काच फोडली आणि की खाली फेकली.
त्यानंतर परभणीत (Parbhani) गोंधळ सुरू झाला. ही घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. यावेळी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका बस आणि ट्रकचे नुकसान केलं. रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. मात्र, त्यातील काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी या.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन चर्चा केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर जमाव तिथून गेला. मात्र, त्यातले 60-70 लोक मात्र थेट रेल्वे स्टेशनवर गेले आणि नंदिग्राम एक्सप्रेससमोर रेल रोको केला. काही वेळाने तो त्यांनी बंद केला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी परभणी शहर आणि जिल्हा बंद अशा प्रकारचे बंद पुकारला आणि हा बंद पुकारल्यानंतर तो शांततेत व्हावा म्हणून या सगळ्या संघटनांना पोलिसांनी शांतता मिटींगला बोलावलं.
या बंद दिवशीच हिंदू संघटनांकडून बांगलादेशातल्या हिंदूंच्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये भारताच्या संविधाना संदर्भात एक शब्द देखील काढण्यात आला नव्हता. या मोर्चाला सर्वपक्षीय लोक उपस्थित होते. त्यामुळे या मोर्चाचा आणि संविधानाच्या अपमानाचा काही संबध नाही. दरम्यान, परभणी बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलनात बहुतांशी लोक प्रशासनाला सहकार्य करून आंदोलन करत होते.
मात्र, त्यातील मोजक्या लोकांनी आंदोलनाला गालबोट लावलं. त्यांनी लोकांच्या आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं अनेक वाहनांची तोडफोड केली. शिवाय या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आल्यानंतर तत्काळ पोलिसांची (Police) बोलणं केलं तर त्यांनी आम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करत नसल्याचं सांगितलं. मात्र, व्हिडिओत दिसत आहे त्या लोकांना अटक करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मात्र, या वेळी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याची तक्रार आहे. त्यामुळे त्यांना सस्पेंड केल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. शिवाय ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या प्रकरणी 51 जणांना ताब्यात घेतल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवर बोलताना त्यांनी सांगितलं की, सोमनाथ सूर्यवंशी हे कायद्याचं शिक्षण घेत होते, ते जाळपोळ करीत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांना न्यायालयीन कोठडीत त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत सरकारकडून केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.