Sunetra Pawar and Beed district administration Sarkarnama
मराठवाडा

Sunetra Pawar: बीड जिल्हा पुन्हा वाऱ्यावर, सुनेत्रा पवार ठरतायेत 'वन डे पालकमंत्री'!

Sunetra Pawar one day guardian minister controversy : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुनेत्रा पवार या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि प्रतिक्रिया जाणून घ्या

Datta Deshmukh

Beed Politics : गुन्हेगारी, खून, दरोडे, अपहरण, महिलांवरील अत्याचारामुळे राज्यभरात बीड जिल्ह्याची झालेली बदनामी दूर करून या जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आणण्याचा विडा दिवंगत नेते अजित पवार यांनी उचलला होता. विशेषतः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणानंतर अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारत मोठे आव्हानही स्वीकारले होते.

पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी आपल्या कामाचा झपाटाही सुरू केला. मोठ्या संस्था, विमानतळ, बीड रेल्वे, पाणी पुरवठ्याच्या योजना अशी एकापाठोपाठ कामे हाती घेत बीडला विकासाच्या ट्रॅकवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि बीडच्या विकासाचे स्वप्नही भंगले.

अजित पवारांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारचे खरे, पण अद्याप त्यांची बीडशी नाळ जोडली गेली नाही. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी आल्यानंतर त्या पुन्हा आल्या नाहीत. त्यामुळे त्या वनडे पालकमंत्री ठरू नये, अशी अपेक्षा बीडकरांकडून व्यक्त केली जात आहे.

मागच्या वर्षी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्विकारले. उपमुख्यमंत्री असल्याने सरकारचा महत्वाचा हिस्सा असलेल्या अजितदादांना विकासाचे व्हिजन आणि प्रशासनातही शिस्त होती.

त्यामुळे जिल्ह्याचे प्रशासन सुतासारखे सरळ आणि विकासाच्या गाडीलाही वेग आला होता. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने त्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली. मात्र, चार महिन्यांत पालकमंत्री केवळ एकदा जिल्ह्यात आल्या. त्याही महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाला.


परिणामी जिल्ह्याशी त्यांचा कनेक्ट कमी झाल्याचा परिणाम, स्वत:चा पक्ष आणि विकासावरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात 48 कोटींनी वाढ होऊन हा आराखडा 623 कोटी रुपयांचा झाला असला तरी यातून जिल्ह्याच्या विकासाचे अंतिम नियोजन करणारी बैठक पालकमंत्रांच्याच दौऱ्यामुळे झालीच नाही.

आता तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक लागली आहे. दिवंगत अजित पवार जानेवारी महिन्यात जिल्ह्यात आले होते. जानेवारीच्या अखेरीस त्यांचा अपघात झाला. त्यानंतर तीन महिन्यांनी एक मे रोजी काही वेळासाठी सुनेत्रा पवार जिल्ह्यात आल्या होत्या.

पवारांनी लावली होती प्रशासनाला शिस्त

अजित पवार बोलण्यात खमके आणि शिस्तीतही पक्के होते. त्यांच्या पदानंतर प्रशासनात कमालीचा बदल झाला होता. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसली होती. साधारण दोन एक महिन्याला जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर बैठकांचा धडाका, कामांच्या पाहण्या आणि लहानशा उणिवा त्यांच्या नजनेतून सुटत नसत.

चुकीचे प्रेझेंटेशन करणार्‍यांना खडे बोल सुनावत ते खाली बसवत. प्रशासनातल्या प्रमुखांशी मंत्रालयातून नित्याने संपर्क करुन 'जे नियमात आहे तेच करा, माझ्या पक्षाचा कोणी चुकीचे सांगत असेल तरी अजिबात ऐकू नका' असे अजित पवार सांगत. त्यामुळे प्रशासन सुतासाखरे सरळ झाले होते.

महसूल विभागातील मावेजा घोटाळा निघण्याचे तेच मुख्य कारण होते. मात्र, सुनेत्रा पवार यांचे दौरेही नाहीत आणि नित्य संपर्क नसल्याने प्रशासनावरील धाकही कमी होण्याची भीती आहे. अलिकडे गुन्हेगारी घटनांत वाढ झाली आहे. अगदी मुख्याधिकाऱ्यांना धमकी दिल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद व्हायला दोन दिवस लागले.

यावरून प्रशासनातील शिस्त काहीशी कमी होत असल्याचे स्पष्ट आहे. अजित पवारांनी जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी आखलेल्या विमानतळ, सीट्रीपलआयटी, तारांगण या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी पालकमंत्र्यांचा जिल्ह्याशी संपर्क आणि पाठपुरावा महत्त्वाचा आहे.

पक्षांतर्गत 'घडी'ही विस्कटण्याची भीती

राजकीयदृष्ट्या पश्‍चिम महाराष्ट्रानंतर बीड हा पवारांसाठी व राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा व ताकद देणारा जिल्हा आहे. राज्यात भाजप नंबर वन असली तरी विधानसभा आणि नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. पण, दिवंगत पवारानंतर सर्व आमदारांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना आहेत. पवारांवरील अपेक्षने सर्वात मोठ्या बीड पालिकेची सत्ता मिळाली.

पण, बीडकरांचे पाणी, शहरांतर्गत रस्त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भरीव निधीची गरज आहे. लातूर - धाराशिव - बीडची जागा पक्षाला घेणे व जिल्ह्यात उमेदवारी मिळावी, यासाठी कोणी ताकदीने प्रयत्न करताना दिसत नाही आणि पक्षप्रमुख सुनेत्रा पवारांचा तसा काही अजेंडा दिसत नाही.

पक्षांतर्गत कुरघोड्या वाढल्या आहेत. संघटनेत राजकीय ताकद असलेल्यांची वाणवा आहे. पवारांच्या नंतर जिल्ह्यातील नेत्यांची एकत्रित बैठकही झाली नाही. एखाद दुसरा पदाधिकारी व्यक्तिगत भेट घेत 'कानगोष्टी' सांगण्याने पक्ष संघटना टिकणे अवघड आहे, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT